
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली होती ज्याला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. 'उगाच कोणाचं तरी श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नका. आज जे बोलणारे हे सगळे आहेत हे सगळे गोधडी ओल्या करत होते त्यावेळेला. यांनी तर तोंडं बंद करावीत.' असं म्हणत आशिष शेलार यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेवर अत्यंत बोचरी टीका केली.
पाहा आशिष शेलारांनी नेमकी काय टीका केली?
'संजय राऊत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर स्वप्नदोष झाल्याचा आरोप करत असाल तर शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे. या बुद्धीदोषाचं उत्तर राऊत साहेब ठाण्याला आहे जवळ आहे तुमच्या. सगळ्या देशाला माहिती आहे की, हे आंदोलन साधू संतांनी सुरु केलं, हिंदू समाजाने केलं. तुमचा जन्म 60 नंतरचा आहे..'
'हे आंदोलन त्याच्या आधीपासून सुरु झालं आहे. जन्म होण्याआधी आणि गोधडी ओली करण्याच्या आधी मी कारसेवेला होतो हे म्हणणाऱ्यांनी स्वत: आत्मपरिक्षण करावं.'
'संघ, विश्व हिंदू परिषद, साधू संत, बजरंग दल, कोठारी बंधू, अशोक सिंघल ही नावं तरी माहिती आहेत का यांना? उगाच कोणाचं तरी श्रेय घेण्याच्या भानगडीत ही गडबडी करु नका. आजचे जे बोलणारे हे सगळे आहेत हे सगळे गोधडी ओल्या करत होते त्यावेळेला. यांनी तर तोंडं बंद करावीत.'
'राजकारण हे तुमच्या डोक्यात घुसलेली घाण आहे. त्यामुळे ती घाण आधी साफ करा हे आमचं शिवसेनेला सांगणं आहे.'
'जबाबदारी रामसेवकांनी घेतली. लढाई संघ, विश्व हिंदू परिषद, भाजपने लढली. दुसऱ्याच्या घरात काही झाल्यावर स्वत:हून पाय टाकणं. हे जबाबदारी घेणं नाही. साधी NC नाहीए तुमच्या नावावर.'
'मुंबईकरांवर हल्ला करणारे जे बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत त्यांच्याशी तुमचा संध्याकाळी आईस्क्रिम खाण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे मुंबईकरांवर हल्ला करणाऱ्यांचे तुम्ही समर्थक आहात. त्यावरही तुम्ही बोलू नका.'
'आम्ही शिस्तप्रिय पक्ष आहोत. आम्ही बाळासाहेबांवर टीका नाही करणार. पण राऊतांचा काय संबंध, उद्धवजींचा काय संबंध? इतिहास बदलता येत नाही. इतिहास बदलण्याची ताकद तुमच्यात नाही.'
'हे मात्र, बरं झालं की.. मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबूल केलं की, मी धूर्त आहे. आमची फसगत मात्र नक्की झाली. आम्ही त्यांना भावासारखं मानलं. ते धूर्त होते हे कळायला आम्हाला उशीर झाला म्हणून त्या धूर्त पद्धतीने आमच्या बरोबर मतं घेतली आणि सरकार दुसऱ्या बरोबर स्थापन केलं. हा धूर्तपणा त्यांनी कबूल केला हे बरं झालं.' असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.
संजय राऊतांनी काय टीका केली होती?
'किती काळ बाबरी ढाच्यावर बोलणार आहात? महाराष्ट्रात आणि देशात महागाईपासून ते बेरोजगारीपर्यंत असंख्य प्रश्न आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी असो किंवा चीनने केलेली घुसखोरी यावरून लक्ष हटवण्यासाठी पुन्हा एकदा हनुमान चालीसा, बाबरी मशीद यावर भाजप आणि त्यांचे समविचारी हे सातत्याने बोलत आहेत.'
'या देशातील लोकांचे प्रश्न पहा. किती बेरोजगारी वाढलीये. महागाईचा कसा स्फोट झालाय. चीनचे लोक घुसलेत, त्यांना बोला. दम द्या. विषय बाबरीचा असेल आणि कुणी म्हणत असतील की, बाबरी पाडली तेव्हा शिवसेना कुठे होती? असं म्हणणाऱ्यांनी त्यांच्याच पक्षातील तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं,' असा उलट सवाल राऊतांनी फडणवीसांना केला.