
मुंबई: महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे बेकायदेशीर, अनधिकृत, अर्तक, बालिश, पोरकट असून कधी नव्हे तेवढे मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. पोलिसांना बदनाम करुन त्यांना आपल्या बंगल्यावरील ‘कांचा' करायचे आहे काय? अशी बोचरी टीका करत भाजपा आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
तक्रारदारांना आतापर्यंत असुरक्षित केले जात होते. आता बेअब्रू केले जात आहे. महाराष्ट्राची बदनामी करण्याचे काम ठाकरे सरकार करित आहे. अशी टिकाही त्यांनी यावेळी केली आहे.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याविरोधात भाजपाचे पदाधिकारी दिव्या ढोले यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्या तक्रारीची दखल तर घेण्यात आली नाहीच उलटपक्षी दिव्या ढोले यांचे अश्लील लज्जास्पद आणि बेअब्रू करणारे मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत आहे.'
या प्रकरणी त्यांनी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार केली त्याचीही दखल घेऊन न्याय मिळत नाही. म्हणून या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आवाहनही केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत या प्रकरणी आज भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिव्या ढोले यांच्या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.
आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर तुफान टीका
यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, 'राज्यात सीआरपीसी, आयपीसी अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. उच्च विद्याविभूषित दलित समाजासाठी काम करणाऱ्या भाजपा पदाधिकारी दिव्या ढोले यांनी केलेल्या तक्रारीची दखल तर घेतली नाही उलटपक्षी अज्ञातांकडून त्यांनाच बेअब्रू करण्याचे षड्यंत्र रचले आहे. त्याची तक्रार केल्यावरही जर या राज्यातील पोलीस आणि सरकार दखल घेणार नसेल तर सीआरपीसी आणि आयपीसी कुठे आहेत?' असा सवाल आशिष शेलार यांनी यावेळी केला आहे.
'तक्रारदाराला ज्या पध्दतीने बेअब्रू केले जाते त्या संशयाची सुई सत्ताधिकारी पक्षाकडे असून या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करुन चौकशी करण्यात यावी. सदर महिला पदाधिकाऱ्याला न्याय द्यायचा असेल तर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करुन चौकशी करणे आवश्यक असताना अशी चौकशी का केली जात नाही? पोलीस असंवेदनशील का वागत आहेत आणि कुणाच्या सुचनेवरुन वागत आहेत? या घटनेमुळे एका महिलेची बदनामी होत नाही तर ठाकरे सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.' असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला आहे.
'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ठाकरे सरकार, सरकार पक्षातील नेते यांच्याविषयी कोणी कोणतेही भाष्य केले तर त्यांच्यावर अजामिनीपात्र गुन्हा, कारावास, हल्ले केले जातात आणि पंतप्रधान अथवा देशाचे गृहमंत्री आणि हिंदू समाज यांच्यावर टीका केली तर मात्र अदखलपात्र गुन्हा, सुटका, समर्थन केले जाते. म्हणजे मुख्यमंत्र्यांवर बोललात तर कारावास आणि पंतप्रधानाच्या विरोधात बोललात तर सत्कार असा कारभार राज्यात सुरु असून हा एकूण कारभार बेकायदेशीर, बालीश, पोरकट आहे.; अशी टीका आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केली
'तसेच तातडीने दिव्या ढोले यांच्या दोन्ही तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही शेलार यांनी केली आहे. राज्यातील महिला आयोगही याबाबत निपक्ष वागताना दिसत नाही त्यामुळे हे प्रकरण पुन्हा केंद्रिय आयोगाकडे गेले की, कोल्हे कुई करु नका.' असा इशाराही आमदार आशिष शेलार यांनी दिला.