
मुंबई: उद्धव ठाकरेंवरती (Uddhav Thackeray) टिका करु नका असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते आणि बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नारायण राणेंच्या (Narayan Rane) दोन्ही मुलांना चांगलेच सुनावले होते. नारायण राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत त्यांना समज देण्याची गरज असल्याचे वक्तव्य केसरकर यांनी केले होते. त्यानंतर माजी खासदार निलेश राणेंनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ''दीपक केसरकरांना (Deepak Kesarkar) उद्धव ठाकरेंचा एवढा पुळका असेल तर मातोश्रीवरती जाऊन भांडी घासा'' असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.
काल निलेश राणेंनी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते की दीपक केसरकर तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते आहात आमचे नाही. युती टिकवण्याची जबाबदारी जितकी आमची आहे तितकीच तुमची आहे. तुम्हाला इज्जत मिळते तर ती घ्यायला शिका, लायकी पेक्षा जास्त बोलू नका. राणेंच्या दोन्ही मुलांनी मतदार संघात तुमची काय अवस्था केली आहे हे विसरु नका. तुम्हाला दुसरं राजकीय जिवदान मिळाले आहे असेही निलेश राणे म्हणाले.
दरम्यान याअगोदर ही किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) उद्धव ठाकरेंवरती टीका करु नका असे सांगण्यात आले आहे. किरीट सोमय्या हे पत्रकार परिषद घेवून ठाकरे कुटुबीयांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होते. त्यावर दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगून उद्धव ठाकरेंवरती टीका करु नका अशी समज किरीट सोमय्यांना द्या अशी विनंती केली होती. त्यानंतर किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली नाही.
बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनीही किरीट सोमय्यांवरती टीका केली होती. उद्धव ठाकरेंवरती बोलणे थांबवा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ, आम्हाला सत्तेची पर्वा नाही सत्तेला लाथ मारुन बाहेर पडू अशी ताकिद गायकवाडांनी सोमय्यांना दिली होती. आता यानंतर निलेश राणे आणि दीपक केसरकर वाद शिगेला पोहोचला आहे. आता हा वाद कुठपर्यंत जातो हे पाहावं लागणार आहे.