
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज (20 जून) मुंबईतील विधानभवनात मतदान पार पडत आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषदेत नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे मतदानासाठी विधानभवनात पोहचले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीवर अत्यंत बोचऱ्या शब्दात टीका केली.
'महाविकास आघाडी हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे.', अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची हेटाळणी केली आहे. हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन फक्त दारुच्या संदर्भात निर्णय घेण्यात मश्गुल असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहेत.
पाहा सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकी काय टीका केली:
'आज जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना फक्त आणि फक्त गेल्या अडीच वर्षात दारुच्या संदर्भातील निर्णय घेणं. म्हणजे राज्याची प्रगती, उन्नती हा चुकीचा भ्रम या सरकारमध्ये होता. तो उतरला पाहिजे. हा माज संपला पाहिजे. हा अंहकार आणि गर्वाचं हरण झालं पाहिजे ही या निवडणुमागची भूमिका आहे.' अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
'चमत्काराचा प्रश्नच उपस्थित होत नाही. आम्ही विजयासाठीच लढतो आहोत. चमत्कारावर आमचा विश्वास नाही. कर्तृत्वावर आणि कर्मावर विश्वास आहे. त्यामुळे आमचे पाचही उमेदवार विजयी होतील.' असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
'राज्यसभेच्या वेळी दोघांनी दावे केले होते. कोणाचा दावा खरा होता. ते आपल्याला त्यावेळी दिसूनच आलं आहे. आमचा प्रयत्न त्याच दृष्टीने सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमचा पाचवा उमेदवार हा जिंकेल असा मला विश्वास आहे. महाविकास आघाडी आणि विशेषत: अपक्षांमध्ये खूपच असंतोष आहे. अडीच वर्षांपासून हे सरकार आहे. पण जनतेच्या हितासाठी कोणतंही काम या सरकारने केलेलं नाही.' असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली आहे.
'दारुबाबत अनेक निर्णय झाले. असे-असे अचंबित करणारे निर्णय झाले. यांनी मोहाच्या फुलांपासून बनणाऱ्या देशी दारुला यांनी प्रमोशन दिलं. सांगितलं की, याला देशी दारु म्हटलं जाणार नाही. विदेशी दारु म्हटलं जाईल. असं दारुला प्रमोशन देणारे.. हे बेवड्यांना समर्पित सरकार आहे. अशा सरकारबाबत जनतेचा आता पूर्णपणे मोहभंग झाला आहे.' अशा बोचऱ्या शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.