आशिष शेलारांकडून कोश्यारींच्या वक्तव्यावर भाजपची भूमिका स्पष्ट; सोबत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर तोफही डागली

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांची देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसलेली प्रतिक्रिया समोर आली आहे.
Ashish shelar on governors statement
Ashish shelar on governors statement

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर चौफेर टीका होत आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. अशात भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांची देखील राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसलेली प्रतिक्रिया समोर आली आहे. राज्यपाल महोदयांनी केलेल्या वक्तव्याशी भाजपा अजिबात सहमत नाही. महाराष्ट्र आणि मुंबई मराठी माणसाच्या परिश्रमातून, घामातून आणि हौतात्म्यातून उभी राहीली आहे. आमचा तेजस्वी इतिहास पानोपानी हेच सांगतो. त्याला कुणीही कुठल्याही पदावरून नख लावण्याचा प्रयत्न करु नये, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांच्या वक्तव्याला विरोध करत त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेबाबत पत्रकारांनी शेलारांना विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, माफी मागायची असेल तर सुरुवात शिवसेनेपासून करावी लागेल. बीएमसीचे सर्व ठेकेदार गेली २५ वर्षे अमराठी होते, त्या बद्दल माफी मागणार का? महापालिकेत एकाच गावातील अमराठी कंत्राटदारांना ठेके दिले जात आहेत. महापालिकेत शिवसेनेची 25 वर्षे सत्ता असताना सर्व कंत्राटे अमराठी कंत्राटदारांना कशी दिली? याची उत्तरे ही शिवसेनेला द्यावे लागतील, असं शेलार म्हणाले.

राज्यपालांनी जे वक्तव्य केले त्याच्यांशी भाजपा सहमत नाही पण सु्प्रिया सुळे यांचे सरकार महाराष्ट्रात होते तेव्हा कुठल्या राज्यपालांनी मराठीत अर्थसंकल्प वाचले होते? कोश्यारी सोडून कोणी मराठीत अर्थसंकल्प वाचून दाखवला? कोणते राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्यांवर चढून जाऊन नतमस्तक झाले होते? त्यामुळे एका वक्तव्यावर लगेच राजकीय पोळी भाजण्याचे काम करु नये, असं देखील आशिष शेलार म्हणाले.

तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपालांवर केलेल्या टीकेला उत्तर देत शेलारांनी आव्हाडांवर निशाणा साधला.जितेंद्र आव्हाडांचा आणि मराठी माणूस या विषयाशी संबंध काय? ते मंत्री होते तेव्हा त्यांच्या दालना बाहेर अमराठी विकासकांचे जोडे का दिसत होते? सगळ्या अमराठी विकासकांचा गराडा का असायचा? आव्हाडांनी राज्यपालांची लायकी काढली ते मर्यादेत बसते का नाही हे जनता पाहते आहे. आव्हाड तुम्ही थंड हवेचे ठिकाण कोणाला विकसीत करायला दिले होते? असे काही सवाल उपस्थित केले.

काय म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी?

"कधी कधी मी महाराष्ट्रातल्या लोकांना सांगत असतो की महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि ठाण्यातून गुजराथी समाजाचे आणि राजस्थानी समाजाचे लोक निघून गेले तर तुमच्याकडे कुठले पैसे उरणारच नाहीत. मुंबईला जे आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते म्हटलंही जाणार नाही" असं मुंबईबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या व्हीडिओत बोलताना दिसत आहेत. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in