'...तर कशाला दिघे साहेबांसमोर नतमस्तक व्हायचं?', नितेश राणेंचा शिवसेनेला खोचक सवाल
मिथिलेश गुप्ता, दिवा: 'दिघे साहेबांचं नुसतं नाव वापरायचं असेल आणि त्यांच्याच विरुद्ध काम करायच असेल तर मग कशाला आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं?', असा खोचक सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला केला आहे. नितेश राणेंच्या या टीकेनंतर आता शिवसेना त्यांना काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते दिव्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
पाहा नितेश राणेंनी नेमकी काय टीका केली
'जे चित्रपटामध्ये दाखवलं आहे तशीच वस्तूस्थिती ठाण्यात आहे का, कान्याकोपऱ्यात तसे काम चालू आहे का? दिघे साहेबांनी उभ्या आयुष्यात ठाण्याच्या प्रत्येक भागात विकास झाला पाहिजे यासाठी शिवसेना उभी केली. पण हा विकास दिव्यामध्ये दिसतोय?' असा सवाल उपस्थित केला.
'डान्सबार, मटका जुगार हे सगळं मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. दिघे साहेबांना हे असं ठाणे अपेक्षित होतं का? मग कशाला आपण त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचं?' असं म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
मंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
'या सरकारमध्ये इकडेच्या पालकमंत्र्यांना नेमके किती अधिकार आहेत? जरा आम्हाला विचारा, त्यांची फाईल त्यांच्याकडे राहत नाही. त्यांची फाईल त्या पेंग्विन आदित्य ठाकरेंकडे असते.'
'नगर विकास खात्याच्या सर्व फाईली आधी आदित्य ठाकरेंकडे जातात. आदित्य ठाकरे त्याच्याकडे नजर फिरवतील, मग त्यांना पाठवतील आणि बाबा सही द्या आणि पुढे पाठवा, बस एवढेच काम आहे. पण इथे एकदम हिरोसारखे फिरत असतात.'
'धर्मवीर हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असणार. दिघे साहेबांवर चित्रपट आहे असे आम्हाला वाटले पण काही जुन्या शिवसैनिकांना विचारले की असं खरं काही झालं होतं का? तर त्यांनी सांगितलं की, इंटरव्हलपर्यंत ठीक आहे पण इंटरव्हलनंतर दिघे साहेबांना कमी आणि आताचे साहेबच जरा जास्त दाखवले आहेत. हे चुकीचे आहे कारण ते नेहमी दरवाजेबाहेरच असायचे, आत कधीच नसायचे या सरकारमध्ये त्यांची काय ताकद आहे?', अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी मंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
'तुम्हाला काही द्यायचे नाही, पाणी द्यायचे नाही, रस्ते द्यायचे नाही, हॉस्पिटल द्यायचे नाही. अहो दिव्यात तुमच्यासाठी साधे पोलीस स्टेशन नाही. मुंब्र्यातून पोलीस बिटची गाडी येते. केस झाल्यावर तुमच्याच शहरातील पोलीस ठाण्यात जाऊ शकत नाही. अशी गाववाल्यांची अवस्था करून ठेवली आहे.' असं म्हणत नितेश राणे दिवे गावातील नागरिकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.
येत्या काही महिन्यात ठाणे महापालिकेची निवडणूक पार पडणार आहे. ज्यासाठी भाजपने आतापासूनच सुरुवात केली आहे. त्याच निमित्ताने आता नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे.