
-योगेश पांडे, नागपूर
'कोणाच्या तरी पोटात दुखतंय की, अजितदादा आणि भाजप हे खऱ्या अर्थाने एकमेकांसोबत प्रेमाने वागत आहेत. पंतप्रधान आणि अजितदादा या दोघांचं चांगलं मत आहे एकमेकांबद्दल. ते मत बिघडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट प्रयत्न करतो आहे.' अशी टीका भाजप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
देहूमधील कार्यक्रमात अजित पवार यांना भाषण न करु दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावेळी भाजपवर जोरदार टीका केली होती. असं असताना भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे.
पाहा चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले:
'संपूर्ण स्टेजवरचं चित्रं बघा. निवेदकाने अजितदादांचं जरी भाषणाकरिता नाव घेतलं नाही तरी पंतप्रधान मोदींनी अजितदादांना विनंती केली की, तुम्ही भाषण करा. पण अजितदादांनी सांगितलं की, मोदीजी आपण बोला. यापूर्वी पुण्यात अजितदादांनी भाषण केलं, मुंबईच्या सभेत उद्धवजींनी भाषण केलं. मला वाटतं काही कारण नसताना देशाचा पंतप्रधान राज्याच्या नेत्याला विनंती करतं की, तुम्ही भाषण करा. तर त्या पंतप्रधानाचे आभार मानायला पाहिजे होते राष्ट्रवादीने. की, मोदीजींनी अजितदादांना प्राथमिकता दिली, बोलायला सांगितलं. संचालन करणारा काय चुकला ते जाऊ द्या. पण देशाचे पंतप्रधान म्हणतात की, अजितदादा आपण भाषण करा.' असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
'अजितदादांनी वेळेअभावी भाषण केलं नाही कारण त्यांना मुंबईतही कार्यक्रम होता. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने या पद्धतीने वातावरण खराब केलं. तुम्ही तर एक हजार गोष्टी केल्या आहेत चुकीच्या.' अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
'जे प्रकल्प देवेंद फडणवीस सरकारने पूर्ण केले त्याचे उद्घाटन करताना त्या ठिकाणी तुमची पद्धत काय आहे. सात-आठ नंबरवर तुम्ही नाव टाकता देवेंद्र फडणवीस यांचं. तुम्ही त्या वेळेस तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही कसे वागता ते.' असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विचारला आहे.
'पंतप्रधान सांगतायेत की, भाषण करा.. भाषण करा.. आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पद्धतीने वागताय.. मला वाटतं की, या काही अजितदादांच्या सूचना नाहीए. कोणाच्या तरी पोटात दुखतंय की, अजितदादा आणि भाजप हे खऱ्या अर्थाने एकमेकांसोबत प्रेमाने वागत आहेत. पंतप्रधान आणि अजितदादा या दोघांचं चांगलं मत आहे एकमेकांबद्दल. ते मत बिघडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट प्रयत्न करतो आहे.' असा दावाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
'भाजपच्या जवळीकीपेक्षा पंतप्रधान काल विमानातून उतरल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने अजितदादांची विचारपूस केली खांद्यावर हात ठेवला त्यामुळे कोणाला तरी असं वाटतं की, अजितदादांचे भाजपशी संबंध असणे चुकीचं आहे.' असा आरोपच यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.