
Brij Bhushan Singh on MNS Raj Thackeray : राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला. त्यानंतर त्यांच्यावर टीका होऊ लागली. राज ठाकरे अयोध्येला येणार असतील तर त्यांना उत्तर भारतीयांची माफी मागावी लागेल अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. राज ठाकरेंनी अयोद्धा दौरा का स्थगित केला याचं कारण रविवारच्या सभेत सांगितलं. त्यानंतर आज बृजभूषण शरण सिंह आणि शरद पवार यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून मनसेने टोलेबाजी केली आहे. याबाबत आता बृजभूषण शरण सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाले आहेत बृजभूषण शरण सिंह?
मी शरद पवार यांना ओळखतो, माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. शरद पवार देशाच्या मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. महराष्ट्र कुस्ती संघासाठी त्यांनी मोठं काम केलं आहे. मी कुस्ती संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे. शरद पवार हेपण कुस्ती संघाचे अध्यक्ष होते. आम्ही कुस्तीसाठी जे काम केलं, त्यासंदर्भात ते माझं कौतुक करत होते. तीन दिवस त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या माळा शरद पवारांसाठी येत होत्या, त्या मला घातल्या याचा मला गर्व आहे. माझे चांगले संबंध आहेत त्यांच्याशी तसंच सुप्रिया सुळे या मला भाऊ मानतात. एका कार्यक्रमात आम्ही गेलो होतो. त्यावेळचा हा फोटो आहे. असं बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी या दौऱ्याला विरोध केला होता. ज्यानंतर राज ठाकरेंनी हा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. याचबाबत राज ठाकरेंनी पुण्यातील सभेत असं म्हटलं होतं की, माझ्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. असं असताना आता मनसेकडून आज एक नवा फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये बृजभूषण सिंह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एका कार्यक्रमात एकत्र दिसत आहेत. हाच फोटो शेअर करुन मनसेने पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी या फोटो ट्विट केला असून यावेळी कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, "ब्रिज" चे निर्माते ... सुज्ञास अधिक सांगणे न लगे ... (फोटो झूम करून पाहावा...) त्यामुळे राज ठाकरे यांनी जो आरोप केला होता की, महाराष्ट्रतून रसद पुरविली गेली त्याविषयी आता थेट शरद पवारांवर मनसेकडून आरोप केला जात आहे.
राज ठाकरेंनी दौरा रद्द करण्याचं नेमकं कारण काय?
'अयोध्या दौरा तूर्तास रद्द.. अनेकांना वाईट वाटलं.. अनेकांना आनंद झालं, अनेक जण कुत्सितपणे बोलायला लागले. म्हणून मी दोन दिवसांचा जरा बफर दिला होता मुद्दामून. काय बोलायचं ते बोलून घ्या एकदा. मग मी माझी भूमिका महाराष्ट्र, देशाला सांगेन. ज्या दिवशी आपण लाऊडस्पीकरची घोषणा केली त्यानंतर मी पुण्यात अयोध्येला जाणार याची तारीख जाहीर केली. त्यानंतर काही दिवसातच हे सगळं प्रकरण सुरु झालं. की, अयोध्येला येऊ देणार नाही.'
'मग ते सगळं वाढत होतं. मी ते सगळं पाहत होतो. काय चाललंय नेमकं. मला मुंबई, दिल्लीमधून देखील माहिती मिळत होती. मला उत्तर प्रदेशातून देखील काही गोष्टी लोकं सांगत होते. की नेमकं काय चाललंय. एक वेळ अशी लक्षात आली की, हा संपूर्ण ट्रॅप आहे. आपण या सापळ्यात अडकलं नाही पाहिजे.'
'कारण या सगळ्या गोष्टींची जी सुरुवात झाली त्याची रसद पोहचवली गेली ज्या गोष्टी गेल्या त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालीए. की, पुन्हा विषय बाहेर काढा. ज्यांना-ज्यांना माझी अयोध्या वारी खुपली होती असे अनेक जण होते. त्या सगळ्यांनी सगळ्या गोष्टी मिळून सगळा आराखडा आखला गेला.'
'मी उद्या समजा तिथे हट्टाने जायचं असं ठरवलं असतं मला माहिती आहे की, आपल्या पक्षामधील हजारो आपले महाराष्ट्र सैनिक, महाराष्ट्रातून अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते. तिथे जर काही झालं असतं तर आपली पोरं गेली असती अंगावर.'
'पण ही माझी महाराष्ट्रातील ताकद हकनाक तिकडे सापडली असती. ती मला सापडू द्यायची नव्हती. मी म्हटलं जात नाही म्हटल्यावर चार शिव्या पण खायल्या पण मी तयार आहे. माझ्यावर टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे. पोरं नाही अडकू देणार मी.' असं कारण देत राज ठाकरे यांनी दौरा रद्द करत असल्याची नेमकी काय भूमिका होती हे स्पष्ट केलं.