"उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर" व्यंगचित्र पोस्ट करत भाजपचा टोला

जाणून घ्या भाजपने व्यंगचित्र पोस्ट करताना नेमकं काय म्हटलं आहे?
"उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर" व्यंगचित्र पोस्ट करत भाजपचा टोला
BJP Shares Cartoon Against CM Uddhav Thackeray and Sharad Pawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा १४ मे रोजी होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या आऱोपांना उत्तर देणार आहेत. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यापासून तीन सभा घेतल्या. तसंच १ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली. त्यामध्ये सरकारवर जे आरोप झाले आहेत त्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देणार आहेत. अशात मुंबई भाजपने एक व्यंगचित्र ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे
शरद पवार आणि उद्धव ठाकरे फोटो-इंडिया टुडे

काय आहे भाजप मुंबईने शेअर केलेलं व्यंगचित्र?

संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे... असा मथळा या व्यंगचित्राला देण्यात आला आहे. त्यानंतर खुर्चीवर शरद पवार बसलेले दाखवण्यात आले आहेत. ते उद्धव ठाकरेंना म्हणत आहेत "उद्धवा दिलेली स्क्रिप्ट व्यवस्थित पाठांतर कर" त्यावर उद्धव ठाकरे वाकून होय साहेब असं म्हणताना दाखवले आहेत. या व्यंगचित्रात एका कोपऱ्यात सोनिया गांधींचाही फोटो दाखवण्यात आला आहे. तर टीव्हीवर मुख्यमंत्र्यांची सभा हिंदुत्वाचा खरा विचार ऐकायला यायलाच पाहिजे अशी ब्रेकिंग न्यूज सुरू असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या टीव्हीचा रिमोट शरद पवारांच्या हाती आहे आणि उद्धव ठाकरेंच्या हाती भाषणाची कॉपी दाखवण्यात आली आहे.

भाजपने मुख्यमंत्र्यांच्या सभेआधीच हे व्यंगचित्र ट्विट करत मुख्यमंत्री आणि शिवसेनेला डिवचलं आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच भाजपकडून कायम हा दावा केला जातो की शरद पवारांच्या हातीच सत्तेचा रिमोट आहे. शरद पवारच पडद्यामागचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे नामधारी आहेत. तसाच आशय या व्यंगचित्रात दाखवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेची जोरदार तयारी सुरू असताना हे व्यंगचित्र भाजपने शेअर केलं आहे.

बुधवारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या सभेचा एक टिझर पोस्ट केला होता. त्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेचे फोटो वापरण्यात आल्याचा दावा मनसे नेते गजानन काळे यांनी केला. त्यानंतर शिवसेनेने हा व्हीडिओ डिलिट केला. त्यापाठोपाठ आता भाजपने व्यंगचित्र शेअर करून शिवसेनेला डिवचलं आहे.

BJP Shares Cartoon Against CM Uddhav Thackeray and Sharad Pawar
टिझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचे फोटो वापरताना शिवसेनेला लाज वाटत नाही का? मनसेने डिवचलं

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली होती. जनमतही त्यांच्या बाजूने होतं. मात्र अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्यावरून या दोन्ही पक्षांमध्ये झालेला वाद, त्यानंतर झालेला काडीमोड हे सगळं महाराष्ट्राने पाहिलंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात यानंतर कधीही शक्य होणार नाही असा वाटणारा महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शरद पवार आणि संजय राऊत हे दोघेही या आघाडीचे शिल्पकार मानले जातात. त्यानंतर मात्र शरद पवारच सरकार चालवत आहेत असं म्हणण्याची एकही संधी भाजप सोडताना दिसत नाही. याबाबत आणि एकूणातच आत्तापर्यंत झालेल्या विविध घडामोडींविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.