Uddhav Thackeray: मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे

जाणून घ्या काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानातील भाषणात?
BJP wants to end Shiv Sena and Thackeray family with Munnabhai Uddhav Thackeray Taunt to Raj Thackeray
BJP wants to end Shiv Sena and Thackeray family with Munnabhai Uddhav Thackeray Taunt to Raj Thackeray

मुन्नाभाईला सोबत घेऊन भाजपला शिवसेना आणि ठाकरे घराणं संपवायचं आहे असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे, भाजप आणि एकनाथ शिंदे तसंच शिंदे गटावर कडाडून टीका केली. राज ठाकरे यांचा उल्लेख मे महिन्यात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुन्नाभाई असा केला होता. तोच शब्द आज परत वापरत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तसंच भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला.

काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी?

भाजप भ्रष्टाचार संपवण्याच्या गोष्टी करतो आहे. त्यांच्याकडे काही मशीन वगैरे आहे का? कारण भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले त्यांनाच सोबत घेतलं आहे. राज्यात समस्या आहेत आणि मुख्यमंत्री फिरत आहेत. आज दिल्ली त्या आधी सुरत, गुवाहाटी, गोवा हे सगळं फिरतं सरकार आहे. कसा कारभार चाललाय कुणालाच माहित नाही.

शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत

शिवसेनेला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र येत आहेत. मी चार दिवसांपूर्वीच मी बोललो होतो की मी आजच्या दिवसाची वाट बघत होतो. ज्यांना कुणाला अंगावर यायचं आहे या तुम्हाला आस्मान काय असतं ते दाखवतो. या एकत्र या, तुमच्या लक्षात आणून देतो की शिवसेनेची ताकद तुम्हाला कळली नाही, पण विरोधकांना कळली आहे. त्यामुळेच शिवसेना संपवण्यासाठी आपल्यातल्या गद्दारांना सोबत घेतलं आहे, मुन्नाभाई सोबत घेतलाय. सगळे एकत्र कशासाठी येत आहेत तर उद्धव ठाकरेला संपवा, ठाकरे घराणं संपवा आणि शिवसेना संपवा. हे समोर बसलं आहे ते माझं ठाकरे कुटुंब आहे संपवा. प्रत्येकाच्या हृदयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तुमची मनं मेलेली असतील माझ्या शिवसैनिकांची मनं थिजलेली नाही.

शिवसेना कधी कुणीही चिरडू शकत नाही

शिवसेना म्हणजे रस्त्यावर पडलेला ढेकूण किंवा झुरळ नाही कुणीही आलं आणि चिरडून गेलं. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजप, शिंदे गट आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला यायचा प्रयत्न करू नका. जर संघर्ष झाला तर त्या गद्दारांमध्ये आणि आपल्यात होईल. रक्तपात शिवसैनिकांमध्ये होईल आणि कमळाबाईचे कपडे साफ राहतील मला तो त्यांचा डाव साधायचा नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

१४ मेच्या भाषणात राज ठाकरेंचा मुन्नाभाई असा उल्लेख करत काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

"मला मध्यंतरी एका शिवसैनिकाने विचारलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं संबंध काय? लगे रहोचा... मी थोडासा पाहिलाय. तर तो मला म्हणाला की त्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी त्याच्याशी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं हां मग... ? तर तो मला म्हणाला की तशी एक केस आहे आपल्याकडे. मी म्हटलं अशी कोणती केस? तर तो म्हणाला अहो ती नाही का? ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. "

"शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादाला तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मी त्याला म्हटलं की अरे त्या सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास? तर तो मला म्हणाला तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही पाहिला. त्यात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे. तर ही केमिकल लोच्याची केस आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत फिरूद्या. हे म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला होता. तोच उल्लेख त्यांनी आजही केला.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in