"आधी गडकरी नंतर फडणवीस, भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण" ब्राह्मण महासंघाचा आरोप

वाचा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ब्राह्मण महासंघाने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं भाजपमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे
Brahman Mahasangh | Devendra Fadnavis| BJP
Brahman Mahasangh | Devendra Fadnavis| BJP

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर सरकार पडणार हे निश्चित होतं. २९ जूनला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती शिंदे आणि भाजप यांचं सरकार येणार याची. या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केलं. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असताना अचानक एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होतील हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केलं.मी सत्तेत सहभागी होणार नाही मात्र सरकार योग्य पद्धतीने चालेल याकडे लक्ष देईन असंही त्यांनी सांगितलं. मात्र त्यानंतर अवघ्या दीड तासात देवेंद्र फडणवीस हे सत्तेत सहभागी होतील तसंच ते राज्याचे उपमुख्यमंत्री असतील हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलं ज्यानंतर एकच खळबळ उडाली. यावर विविध चर्चा होत असतानाच ब्राह्मण महासंघाने भाजपमध्ये ब्राह्मणांचं खच्चीकरण केलं जातं आहे असं म्हटलं आहे. नितीन गडकरींपाठोपाठ आता देवेंद्र फडणवीस यांनाही डावललं गेल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला आहे.

काय आहे ब्राह्मण महासंघाची (Brahman Mahasangh) पोस्ट?

भाजप मध्ये ब्राह्मणांचे खच्चीकरण !

पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नितीन गडकरी यांचं चारित्र्य हनन करण्यात आलं. या माध्यमातून त्यांचं खच्चीकरण केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं खच्चीकरण केलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांची घोडादौड अडविण्याकरीता पूर्ण बहुमतापेक्षा अधिक संख्या आमदारांना निवडून आल्यानंतर सरकार न बनविण्याचा षड्यंत्र आखून योजनाबद्ध पद्धतीने देवेंद्र फडणवीस याना सत्तेपासून लांब ठेवण्यात आलं.

आता फडणविस यांनी आपल्या राजकीय कौशल्यातून पुन्हा भाजपला सत्तेचा दारापर्यंत पोहचविले नंतर मा.एकनाथ शिंदे यानां मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देशन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्रीपदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरवलं. मात्र त्यानंतर नंतर भाजपातील वरीष्ठ नेत्रत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी आग्रह धरून देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण करण्यात आलं आहे. भाजप मध्ये एकानंतर एक ब्राह्मण नेत्यांचं खच्चीकरण करण्याचे एक सुनियोजित कायस्थान चाललं आहे. ही बाब निदर्शनात येत आहे. याघटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तीव्र शब्दात निषेध करत आहे.

डॉ. गोविन्द कुलकर्णी,

अध्यक्ष

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ

हे पत्र फेसबुकवर पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ब्राह्मण महासंघाने लिहिलं आहे. ब्राह्मण समाजाचं भाजपमध्ये खच्चीकरण केलं जातं आहे असाही आरोप ब्राह्मण महासंघाकडून केला गेला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in