
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये सभा पार पडली. यासभेला हजारो शिवसैनिक राज्याच्या विविध भागातून उपस्थीत होते. मुख्यमंत्र्यांनी अनेकांवरती आपल्या खास ठाकरे शैलीत टीका केली. आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सभेआधी पैसे वाटल्याची टीका भाजप आणि मनसेने केली आहे. तशा आशयाचे फोटो नितेश राणे, निलेश राणे, मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केले आहेत. त्याला शिवसेनेनेही पलटवार केला आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी चंद्रकांत खैरेंचा फोटो ट्विट करत सभेसाठी येण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप केला आहे. ''चंदू खैरे सभेआधी पैसे वाटताना…चंदू खैरेंचा ‘आक्रोश’ - सभेसाठी या रे'' असे कॅप्शनही त्यांनी फोटोला दिले आहे. त्याचबरोबर भाजप आमदार नितेश राणे यांनीही तोच फोटो ट्विट करत ''विराट सभेची चा formula?'' असे कॅप्शन दिले आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी तर मुख्यमंत्र्यांच्या सभेला ४० टक्के मैदान रिकामं असल्याची टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट करत शिवसेनेवरती निशाणा साधला आहे. संभाजीनगर येथील सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते. ''भाषण संपेपर्यंत 40% मैदान रिकामं झालं होतं आणि म्हणे हे लाडके मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा तुम्ही बोललात मी संभाजीनगर नाव कधीही करू शकतो पण लगेच विषय बदलला.'' अशी टीका राणेंनी केली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ टाकत सभेवरती टीका केली आहे.
शिवसनेचा पलटवार
चंद्रकांत खैरेंच्या या संपुर्ण प्रकरणावर शिवसेनेच्या प्रवक्ता शिल्पा बोडखे यांनी पलटवार केला आहे. त्यांनी हा व्हायरल होत असलेला फोटो जुना असल्याचे सांगितले आहे. कालच्या सभेचे काही फोटो टाकत त्यांनी तो फोटो जुना असल्याचा खुलासा केला आहे. ''बालिश बुद्धीच्या लोकांना काय ट्विट करावे हे देखील कळत नाही, स्वताला नेते संबोधून घेतात, काम मात्र दोन रूपये प्रति ट्विट वाले करतात, चंद्रकांत खैरे जी काल कोणत्या रंगाचे कपडे घालून होते व हे दोन रूपये प्रति ट्विट वाली गॅगं कुठले तरी जुने फोटो ट्विट करत आपले बुद्धी प्रदर्शन करत आहे'' अशा आशयाचे ट्विट शिल्पा बोडखे यांनी केले आहे.