'औरंगजेबाचा जन्म गुजरातेत झाला अन्...'; संजय राऊतांचे मोदी-ठाकरेंवर टीकेचे बाण

छत्रपती शिवाजी महाराज समाधी जीर्णोद्धार वादावर राऊतांचं रोखठोकमधून भाष्य
'औरंगजेबाचा जन्म गुजरातेत झाला अन्...'; संजय राऊतांचे मोदी-ठाकरेंवर टीकेचे बाण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केल्याचा दावा केला. त्यावरून मोठा निर्माण झाला असून, यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच राऊतांनी औरंगजेबाचा दाखल देत राज ठाकरेंबरोबर मोदींवरही टीकेचा बाण डागला.

राऊत रोखठोकमध्ये म्हणतात, "आता शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी कुणी शोधून काढली यावर ‘टिळक विरुद्ध फुले’ असा निरर्थक वाद राजकारण्यांनी सुरू केला. तो वाद कमी पडला म्हणून १९९२ सालात अयोध्येतील बाबरी नक्की कोणी पाडली, असा वाद भारतीय जनता पक्षाने सुरू केला. इतक्या वर्षांनंतरही श्रेयवादाचे युद्ध संपले नाही व अयोध्येत राममंदिर उभे राहिले तरी युद्ध सुरू आहे. बाबरी हिंदुत्वाच्या लाटेत उद्ध्वस्त झाली, त्या लाटेच्या शिखरावर शिवसैनिक होते. बाबरी पडली हे महत्त्वाचे."

पुढे राऊत म्हणतात, "शिवाजी महाराजांचा जन्म सन १६२७ मध्ये झाला असे काही इतिहासकार मानतात, तर काही इतिहास संशोधक छत्रपतींचा जन्म १६३० मध्ये झाला असे मानतात. जन्म केव्हाही झाला तरी त्यामुळे काही किरकोळ तपशिलांपलीकडे मुख्य ऐतिहासिक चरित्रात फरक पडत नाही. मुळात शिवाजीराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला हे महत्त्वाचे. जन्म-तिथीचा अनिश्चितपणा अनाठायी आहे," असं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे.

मोदींनाही चिमटा?

सध्या केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष दिसत आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी पेट्रोल-डिझेलवरील कर कपात करण्यावरून केंद्राला प्रत्युत्तर दिलं होतं. चक्रीवादळानंतर केंद्राकडून गुजरात जास्त मदत दिल्याचाही उल्लेख केला होता. या सगळ्या वादावरून राऊतांनी अप्रत्यक्षपणे मोदींना चिमटा काढला आहे.

"आपले पंतप्रधान मोदी हे त्यांच्या भाषणात ऐतिहासिक दाखले देत असतात. शिखांचे धर्मगुरू तेजबहादर सिंग यांच्या ३०० व्या जन्मतिथीनिमित्त त्यांनी लाल किल्ल्यावरून भाषण केले. औरंगजेब किती क्रूर व अत्याचारी होता याची आठवण त्यांनी करून दिली, पण एक गोष्ट इतिहास म्हणून सगळ्यांच्याच नजरेतून सटकते. शिवाजी महाराजांचा जन्म जसा महाराष्ट्रात झाला तसा औरंगजेबाचा जन्म गुजरातेत दाहोद येथे झाला."

"लहान असताना बापाबरोबर त्याच्या संपूर्ण हिंदुस्थानात दोन फेऱ्या झाल्या. बादशहा होण्यापूर्वी पंधरा वर्षे त्याने महाराष्ट्राचा कारभार केला आणि त्याच्या आयुष्याची अखेरची पंचवीस वर्षे ही महाराष्ट्रातच युद्ध करण्यात गेली. यावरून शिवाजी राजे व बादशहा औरंगजेब यांचा सामना किती अपूर्व व दीर्घद्वेषी होता हे लक्षात येईल," असं राऊतांनी म्हटलेलं आहे.

"रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरे यांनी संभाजीनगरातील सभेत लावला. त्यात तितकेसे तथ्य नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजीराजांच्या समाधीचा रायगडावरून शोध लावला याबाबत एकमत आहे, पण त्याबाबत दोन भिन्न प्रवाह आहेत व दोन्ही प्रवाहांचा आदर करणे हेच योग्य आहे."

"१८६९ साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ल्यावरील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. शिवरायांची समाधी तेव्हा भग्नावस्थेत होती. शिवराय नावाचे तुफान त्या भग्न समाधीत शांतपणे पहुडले होते. ते तुफान पुन्हा उठल्याशिवाय गुलामगिरीत खितपत पडलेल्या तरुणांना प्रेरणा मिळणार नाही हे फुले यांनी ओळखले व त्यांनी शिवरायांची समाधी जगासमोर आणली," असं राऊत म्हणतात.

"१८८३ मध्ये जेम्स डग्लस नावाच्या एका इतिहासप्रेमी इंग्रजाने शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुरवस्थेविषयी ब्रिटिश सरकारवर टीका केली. त्यावेळी मराठी माणसाच्या मनात असलेली अस्वस्थता जाणून लोकमान्य टिळकांनी श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला. शिवाजी महाराजांच्या बाबतीत महात्मा फुले यांच्याइतकेच लोकमान्य टिळकांचेही काम मोठे आहे. समाधी प्रकरणात उगाच इतिहास चिवडत बसण्यात काय अर्थ व ‘टिळक विरुद्ध फुले’ असा जातीय रंग तरी का द्यायचा?," असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

"मराठ्यांच्या इतिहासातील गोंधळ इतिहास संशोधकांनीच किती निर्माण केला याचेच संशोधन आता झाले पाहिजे. इतिहास किती चिवडत बसाल? ज्यांना काहीच निर्माण करता येत नाही तेच इतिहास चिवडत बसतात किंवा इतिहास उद्ध्वस्त करतात. दिल्लीत व महाराष्ट्रात तेच घडत आहे," असं म्हणत राऊतांनी राज ठाकरे आणि मोदींवरही निशाणा साधला आहे.

Related Stories

No stories found.