चंद्रकांत रघुवंशींची विनंती अन् एकनाथ शिंदेंचा वायुवेग; नंदुरबारला ३ मिनिटात ७ कोटी मंजूर

नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
Eknath Shinde
Eknath ShindeMumbai Tak

नंदुरबार : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना शासन अधिकाऱ्यांना अहवाल सादर करा म्हणण्यात वेळ घालवणार नाही, तर थेट फोन करुन आदेश देणार असं सांगितलं होतं. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या वाक्याची प्रत्यक्ष अनुभती आज नंदुरबारकरांना घेता आली. शिंदे यांनी एका फोनमध्ये ३ मिनिटात ७ कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आज नंदुरबार दौऱ्यावर आहेत. आज सकाळी त्यांच्या हस्ते नंदुरबार नगरपालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचीही उपस्थिती होती. यानंतर छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरच्या आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली.

या दरम्यान, व्यासपीठावर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचं भाषणं सुरु होतं. त्यावेळी रघुवंशी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना नंदुरबार नगरपरिषदेच्या नुतन इमारतीसाठी शासनाकडून अद्याप बाकी असलेला 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. तसंच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण सांगितली. विलासराव देशमुख आलेले असताना त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी 3 दिवसात मंजूर केला असे सांगितले.

चंद्रकांत रघुवंशी यांनी ही मागणी करताच लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात फोन फिरवला आणि करून तात्काळ आदेश काढण्यासाठी भुमिका घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन गेल्याने अधिकाऱ्यांनी 3 मिनिटात आदेश काढले. अशा पद्धतीने मंचावरुनच त्यांनी 7 कोटी 28 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेचे उपस्थितांनी टाळ्या वाजवीत आणि घोषणा देत स्वागत केले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in