"तू खंबीरपणे उभी राहिलीस.." म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्नीसाठी खास पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांना त्यांनी वाढदिवसाच्या खास शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत
CM Eknath Shinde Emotional Post About His Wife Lata shinde
CM Eknath Shinde Emotional Post About His Wife Lata shinde

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत जे बंड पुकारलं त्यामुळे राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावं लागलं आणि भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी केलेलं बंड, त्यांना लाभलेली आमदारांची साथ, त्यानंतर त्यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची शपथ या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्राने पाहिल्या. या सगळ्या संघर्षाच्या काळात साथ दिल्याबद्दल शिंदे यांनी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याबद्दल भावूक पोस्ट लिहिलीये.

एवढंच नाही तर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीसह केलेली विठ्ठलाची पूजाही महाराष्ट्राने पाहिली. संपूर्ण शिंदे कुटुंबासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणं ही बाब अत्यंत आनंदाची आणि समाधानाची ठरली. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनीही जेव्हा एकनाथ शिंदे ठाण्यात आले तेव्हा स्वतः ढोल वाजवत त्यांचं अत्यंत अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. लता शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासाठी भावूक ट्विट केलं आहे. त्यांनी पोस्ट केलेलं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.

एकनाथ शिंदे यांनी लता शिंदे यांच्याबद्दल काय म्हटलंय?

जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस,सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने आणि अतिशय मायेने हाकलास.तुझ्यासारखी सुजाण,सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो.लता,वाढदिवसाच्या शुभेच्छा. अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना आपले राजकीय गुरू मानतात. त्यांच्या दोन मुलांचं निधन झालं. त्यावेळी त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यावेळी आनंद दिघे यांनी आपल्याला कसं सावरलं हे देखील एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होतं. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. आधीच्या सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना विश्वासमत ठराव जिंकायचा होता. तो जिंकल्यावर त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणाची चर्चाही चांगलीच रंगली होती. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे जेव्हा आमदारांसह गुवाहाटीत होते तेव्हाही ते जे ट्विट्स करत होते त्याचीही चर्चा रंगली होती. आता त्यांनी त्यांच्या पत्नी आणि मिसेस सीएम लता शिंदे यांना ज्या शुभेच्छा दिल्या आहेत त्याही चांगल्याच चर्चेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in