Advertisement

"फक्त ५० खोके? कसले मिठाईचे का?" एकनाथ शिंदेंनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत उडवली संजय राऊत यांची खिल्ली

CM Eknath Shinde Slams Sanjay Raut Allegations About 50 Boxes in the Funny Way
CM Eknath Shinde Slams Sanjay Raut Allegations About 50 Boxes in the Funny Way

नाशिकमध्ये बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंड केलेल्या ५० आमदारांवर टीका केली आहे. ५० खोके पचणार नाहीत, गुलाबरावांचा जुलाबराव होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवत ५० खोके कसले? मिठाईचे का? असं म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)?

जे आरोप करत आहेत त्यांच्याकडे काहीही काम उरलेलं नाही त्यामुळे ते असे आरोप करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या आरोपांमध्ये तथ्य नाही. खोके पाठवले सांगत आहेत ते कसले खोके मिठाईचे होते का? असा प्रश्न विचारत पैसे वाटप झाल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला. तसंच संजय राऊत यांना टोलाही लगावला.

संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकमध्ये काय म्हणाले होते?

आमदार फुटल्यामुळे शिवसेना फुटलेली नाही. शिवसेना आपल्या जागेवरच आहे. आमदारांकडून बंड केल्याबाबत विविध कारणं दिली जात आहेत. निधी मिळत नसल्याची, राष्ट्रवादीने कोंडी केल्याची फक्त कारणं आहेत. लवकरच गुलाबराव पाटील यांचा जुलाबराव होईल. जी ५० खोकी या सगळ्यांना देण्यात आली आहेत ती यांना पचणार नाहीत. ५० कोटी रूपये आमदारांना दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. एवढंच नाही तर शिवसेनेने सामान्य माणसांना संधी दिली नेतृत्व उभं केलं. अशा लोकांनीच दगा दिला. यांना बाळासाहेब ठाकरेही कधीच माफ करणार नाहीत. असं म्हणत टीका केली होती.

संजय राऊत यांच्या टीकेबाबत दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी कसले खोके? मिठाईचे का?असं म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला. तसंच ज्यांना आता काही काम उरलेलं नाही असे लोक आरोप करत सुटले आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याचं कारण नाही असंही म्हटलं आहे. संजय राऊत यांनी जे आरोप केले त्याची एकनाथ शिंदे यांनी खिल्ली उडवली आहे.

आणखी काय म्हटले एकनाथ शिंदे?

आमचं सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे, आमच्या मनात काहीही शंका नाही. आमचं सरकार जे आत्ता आलं आहे ते अडीच वर्षांपूर्वीच यायला हवं होतं. आता लोक आमच्याबाबत विविध चर्चा करत आहेत ते त्यांना करू द्या. महाराष्ट्राचा विकास हे आमचं ध्येय आहे. मध्यवाधी निवडणुकांचीही चर्चा केली जाते आहे मात्र अशी वेळ येणारच नाही कारण आमच्याकडे १६४ आमदारांचं बहुमत आहे. समोर ९९ आमदार आहेत. आमचं हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. तसंच मी पुढच्या २५ वर्षांसाठीचं बोलत नाही पण यापुढे जी विधानसभा निवडणूक होईल त्यातही आम्ही जिंकून येऊ असाही विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in