
मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने आपल्या सोशल मीडियावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर विकृत भाषेतील पोस्ट शेअर केली आहे. तिच्या याच पोस्टबाबत स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केतकीचा खरपूस समाचार घेतला आहे. 'तुझ्यावर काही संस्कार झालेले आहेत की नाही?' असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांनी केतकी चितळेला झापलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केतकी चितळेला काय सुनावलं?
'इथे येताना मी टीव्हीवर बातमी बघितली कोणतरी बाई आहे तिने शरद पवारांवर कॉमेंट केली आहे. फार विचित्र कॉमेंट आहे. काही घरी आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहीण आहेत की नाही? काही संस्कार होतात की नाही तुमच्यावर?'
'किती काही जरी झालं तरी बाई तुझा संबंध काय? कोणावर बोलतेस.. काय बोलतेस? जर हे तुझं वक्तव्य असेल तर तर तुझ्या मुलांचं काय होणार.. ती काय होणार उद्या?'
'सुस्कृंतपणा जो आहे तो आपल्या देशातून, राज्यातून जात चालला आहे. तो आपल्याला जपायचा आहे. ते खरं आपलं हिंदुत्व आहे. सुस्कृंतपणा जपणं.. नाही तर म्हणायचं कशाला?'
'फक्त श्लोक म्हणायचे आणि तिकडे जाऊन वाट्टेल ते करायचं. मग करुन करुन भागले आणि देवपुजेला लागले हे तुमचं हिंदुत्व?' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केतकी चितळे हिला सुनावलं आहे.
अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी विकृत पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कळंबोलीतून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यानंतर तिला कळवा या ठिकाणी आणलं जाणार आहे.
शुक्रवारी रात्री केतकी चितळेने एक फेसबुक पोस्ट केली. या पोस्टमध्ये शरद पवारांविषयी आक्षेपार्ह कविता पोस्ट केली. त्यानंतर आता केतकी चितळेवर पोलिसांनी कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे.
केतकी चितळेने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरून शेअर केलेली पोस्ट अॅड नितीन भावे नावाच्या व्यक्तीची आहे. या पोस्टमध्ये शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत भाषेत लिहिलेलं असून, त्यावरून केतकी चितळे आता टीकेची धनी ठरली आहे. त्याचबरोबर केतकी चितळे ठाणे जिल्ह्यातील कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
केतकी चितळेने पोस्ट केलेली पोस्ट
"तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll
ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक
सगळे पडले उरले सुळे l सतरा वेळा लाळ गळे ll
समर्थांचे काढतो माप l ते तर तुझ्या बापाचेही बाप ll
ब्राह्मणांचा तुला मत्सर l कोणरे तू ? तू तर मच्छर ll
भरला तुझा पापघडा l गप! नाही तर होईल राडा ll
खाऊन फुकटचं घबाड l वाकडं झालं तुझं थोबाड ll
याला ओरबाड त्याला ओरबाड l तू तर लबाडांचा लबाड ll
-अॅड. नितीन भावे (Advocate Nitin Bhave)
ही कविता केतकीने पोस्ट केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. तसंच गुन्हाही दाखल झाला. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे.