"डोक्यात केमिकल लोच्या झालेले मुन्नाभाई फिरत आहेत" उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणात?
"डोक्यात केमिकल लोच्या झालेले मुन्नाभाई फिरत आहेत" उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या बीकेसी मैदानावर सभा घेतली. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला. बाबरी शिवसेनेनेच पाडली याचा पुनरूच्चार केला तसंच ६ डिसेंबरला जेव्हा बाळासाहेब ठाकरेंना फोन आला होता ती आठवणही सांगितली. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांवरही त्यांनी उत्तरं दिली.

प्रश्न होता तो म्हणजे मुख्यमंत्री राज ठाकरेंना काही बोलणार का? राज ठाकरे यांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी त्यांना टोला लगावला आहे. डोक्यात केमिकल लोच्या झालेले मुन्नाभाई महाराष्ट्रात फिरत आहेत असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री MandarDeodhar

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"मला मध्यंतरी एका शिवसैनिकाने विचारलं, साहेब तुम्ही तो लगे रहो मुन्नाभाई पाहिलात का? मी त्याला विचारलं संबंध काय? लगे रहोचा... मी थोडासा पाहिलाय. तर तो मला म्हणाला की त्यात नाही का संजय दत्तला गांधीजी दिसतात. गांधीजी त्याच्याशी बोलतात, मग तो गांधीगिरी करायला लागतो. मी म्हटलं हां मग... ? तर तो मला म्हणाला की तशी एक केस आहे आपल्याकडे. मी म्हटलं अशी कोणती केस? तर तो म्हणाला अहो ती नाही का? ज्याला स्वतःला बाळासाहेब झाल्यासारखं वाटतं. "

"शाल घेऊन फिरतात. कधी मराठीच्या नादाला तर कधी हिंदुत्वाच्या नादाला लागतात. मी त्याला म्हटलं की अरे त्या सिनेमातला मुन्नाभाई लोकांचं भलं तरी करत होता. हा कुठला मुन्नाभाई काढलास? तर तो मला म्हणाला तुम्ही त्या पिक्चरचा शेवट नाही पाहिला. त्यात शेवटी त्या संजय दत्तला कळतं की आपल्या डोक्यात केमिकल लोच्या झाला आहे. तर ही केमिकल लोच्याची केस आहे. असे मुन्नाभाई फिरत आहेत फिरूद्या.. ज्यांना कुणालाही अयोध्येला जायचं आहे जाऊद्या." असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

"डोक्यात केमिकल लोच्या झालेले मुन्नाभाई फिरत आहेत" उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
'...आणि हे टॉमेटो सॉस लावून येणार', उद्धव ठाकरेंची सोमय्यांवर तुफान टीका

आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"महाराष्ट्राला बदनाम करणं सुरू आहे. आम्ही संयम बाळगतो आहोत म्हणजे बोलू शकत नाही असं नाही. सत्ता मिळत नाही म्हणून जे काही चाललं आहे ते दुर्दैवी आहे. भाजप कोणत्या दिशेने चाललं आहे तेच कळत नाही. महाराष्ट्र विद्रुप करण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. हिंदुत्वाची चिंता करण्याची गरजच नाही तुम्हाला त्यासाठी आमचे मावळे इथे बसले आहेत."

"मुंबईत माफियाराज सुरू आहे असं चित्र उभं केलं जातं आहे. आता दाऊदच्या मागे लागले आहेत. पण दाऊद म्हणाला की भाजपमध्ये येतो तर मंत्री म्हणून तो त्यांच्यासोबत कधीही दिसू शकतो. कदाचित म्हणूनच त्याच्या मागे लागले असतील. आमच्यामध्ये ये तुला मंत्री करतो आणि सांगतील दाऊद म्हणजे आमचा गुणाचा पुतळा आहे. ही अशी चित्रविचित्र भानगडी करणारी माणसं पाहिल्यानंतर हे स्वतःला हनुमान पुत्र म्हणवू तरी कसे शकतात? असा प्रश्न मला पडतो."

Related Stories

No stories found.