
आम्हाला घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणत होते. आज माझंही तेच म्हणणं आहे. खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्या सोबत होता. तो आज देशाची दिशा भरकटवतो आहे. आमचं हिंदुत्व हे कसं आहे? तर ते गदाधारी आहे हे मी म्हटलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की यांचं हिंदुत्व गधाधारी आहे. त्याला आज उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
गदा पेलायला हातात ताकद हवी. ती ताकद शिवसेनेची आहे. त्यामुळे मी आपलं हिंदुत्व गदाधारी आहे असं म्हटलं होतं. त्यावर आपले देवेंद्र फडणवीस बोलले, यांचं हिंदुत्व गधाधारी आहे. आमचं हिंदुत्व गधाधारी होतं ते आम्ही सोडलं. आमच्यासोबत जो गधा होता म्हणजे तुम्ही होतात त्याला आम्ही सोडून दिलं आहे. आता करा काय करायचं आहे ते. भाजप नावाच्या गाढवाचा काही उपयोग नाही. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. त्यामुळे गाढवाला सोडून दिलं.
आता त्यांचे आमचे फोटो सोबत असतील जुने ते पाहिल्याने फडणवीसांना वाटलं असेल की आमचं हिंदुत्व गधाधारी आहे. पण गाढवाने आम्हाला लाथ मारण्याआधी आम्ही त्या गाढवाला लाथ मारली आणि हाकलून दिलं. आमच्या सोबत काही गाढवं घोड्याच्या आवेशात वावरत होती. तुम्हाला हाकललं आहे आता काय करायचं ते करा.
१ मे रोजी भाजपची सभा होती, त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलून गेले मुंबई स्वतंत्र करणार. तुमच्या १७६० पिढ्या इकडे आल्या तरीही ते शक्य नाही. जो कुणी मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न करेल त्याचा समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मुंबई तोडण्याचा डाव भाजपकडून सुरू आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळात संघ अस्तित्त्वात होता. मात्र संघ स्वातंत्र्यलढ्यात उतरलेला नाही.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला तेव्हा शिवसेना तेव्हा नव्हती. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबांना म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंना मदत करत होते. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे म्हणून संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. यातून पहिल्यांदा कोण फुटलं तर जनसंघ. कारण ते जागावाटपावरून भांडले.
तेव्हापासूनच यांना मुंबईचा लचका तोडायचा होता. हा लचका तोडण्याच मनसुबा लक्षात घ्या. देवेंद्र फडणवीस यांचं वाक्य चुकून आलेलं नाही. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे आणि मराठी आमचा प्राण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी एक उपाय सांगितला. पेट्रोल-डिझेलचे दर कमी करा असं त्यांनी सांगितलं म्हणजे कोरोना कमी होईल असं त्यांनी सांगितलं असंच मला वाटलं. यांना मुंबई फक्त ओरबडण्यासाठी पाहिजे.