
औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये तोफ धडाडली. अनेक दिवसांपासून शिवसेनेवरती औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरुन टीका केली जात आहे. भाजपने मागच्या काळात औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा देखील काढला होता. आजच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर स्पष्टच बोलले आहेत. पाणीपुरवठ्याची एक जुनी योजना आहे. जी गंजून-सडून गेली आहे. तिच्यासाठी देखील पैसा देतोय. गेल्या वर्षी मी आलो होतो समांतर जलवाहिनी योजनेच्या उद्घाटनासाठी. त्याचं भूमिपूजन मी केलं होतं. तेव्हा मी वचन दिलं होतं. की, या योजनेचा पाठपुरावा मी स्वत: करेन.
दुर्दैवाने दीड वर्ष कोरोनामध्ये गेलं. पण कोरोनामुळे आम्ही रडत नाही बसणार. मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, जे कोणी मध्ये येतील त्यांना दांडुक्यांनी सरळ करा आणि ही योजना पूर्ण करा. मग एक प्रश्न निर्माण झाला की, इतर वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. पण तरीही मी सांगितलं की, या योजनेला एकही पैसा कमी पडू देणार नाही. पण एवढं करुनही जर कंत्राटदार आढ्याला पाय लावून बसला तर मी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की, सरळ पकडायचं आणि त्यांना आत तुरुंगात टाकायचं. असे सगळे निर्णय मी घेतले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री औरंगाबादच्या नामांतरच्या मुद्दावर देखील स्पष्ट बोलले आहेत. संभाजी नगर कधी करणार? संभाजी नगर कधी करणार? हे विरोधकांकडून बोललं जातं. ते माझ्या वडिलांनी दिलेलं वचन आहे. मी ते विसरलेलो नाही. विधानसभेत ठराव मंजूर झाला आहे. सुरूवात म्हणून विमानतळाचं नाव संभाजी नगर करा असं आम्ही केंद्राला सांगितलं आहे तो ठराव अजून केंद्राने मंजूर का केलेला नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. मी जेव्हा या शहराचं नाव संभाजी नगर करेन तेव्हा छत्रपती संभाजी राजांना अभिमान वाटेल असं संभाजी नगर घडवून दाखवेन असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नाव दिलं जाणारच असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.