
मुंबई: भाजप-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात 2017 सालीच युती होणार होती असा भाजप नेत्यांकडून दावा केला जात आहे. भाजपच्या याच दाव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आता एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'लोकसत्ता' या वृत्तपत्राला सोशल मीडिया लाइव्हच्या माध्यमातून दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी मुलाखतीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांना 2017 साली भाजप-NCP-शिवसेना युती होणार होती का? यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.
'2017 साली महापालिका निवडणुका होत्या. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेचीच युती तुटली होती. जिथे आमचीच युती तुटली होती तिथे तीन पक्षांच्या युतीचा प्रश्न येतो कुठे?', असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी भाजपचा दावाच फोल होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला.
पाहा यावेळी उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'किमान शिवसेनेला तरी माहिती नव्हतं की, यांचं छुपं काय चाललं आहे ते. त्यामुळे तुम्ही जे म्हणतायेत तीन पक्षाची युती ही त्यावेळेला आम्हाला तरी सांगितली गेली नव्हती.'
'मी प्रामाणिकपणे सांगतो. मला खोटं बोलायचं नाही. मला माझ्या लोकांशी खोटं बोलता येत नाही आणि मी बोलत पण नाही कधी. प्रामाणिकपणे बोलायचं तर जी माझ्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली ती शिवसेना-भाजप युतीमध्ये झाली. साधारण 25-30 वर्ष ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच होती. त्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी हा विषय कदापि आलेला नव्हता.'
'2017 मध्ये असं नेमकं काय होतं की, यावेळेला यांना नेमकी युती करावीशी वाटली होती. कारण तेव्हा महापालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी तर भाजप आणि शिवसेनेचीच युती तुटली होती. जिथे आमचीच युती तुटली होती तिथे तीन पक्षांच्या युतीचा प्रश्न येतो कुठे?'
'आता दंतकथा म्हटलं तर. दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतील तर कुठल्या दाताचे कुठली कथा.. हे जे बोलतायेत ते दाखवायचे दात असतील.'
'पूर्वी दोन विरुद्ध दोन होतं आणि मला आता तो इतिहास पुन्हा उगाळायचा नाहीए. कारण लोकांना ते समजून चुकलेलं आहे. आता तरी पाहाल तर सगळ्यांना आश्चर्य वाटतंय की, पहिले आम्ही तिघे एकत्र आलो हे सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं. तीन पक्षाच्या सरकारने अर्धा कालखंड तर मजबुतीने पूर्ण केलाय याचं आमच्या विरोधकांना आश्चर्य वाटतंय. म्हणजे तीन विचारधारेचे तीन पक्ष एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने आणि मजबुतीने पक्ष चालवतायेत हे एक-एक त्यांना आश्चर्याचे धक्के आहेत.'
'निवडणुकीच्या नंतर देखील हे धक्के कायम राहतील. जोपर्यंत एकमेकांच्या मनात पाप येत नाही. मित्र म्हणायचं आणि पाठीत वार करायचा. असा विचार कोणाच्या मनात येत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा 25-30 वर्ष भाजपसोबत राहिलोच होतो.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, आमची युतीविषयी 2017 साली काहीही चर्चा झाली नव्हती.
आता उद्धव ठाकरेंनी दिलेल्या या स्पष्टोक्तीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.