
काँग्रेसचे मंत्री कणा नसलेले आहेत ते शरद पवारांचं ऐकतात की सोनिया गांधींचं ऐकतात तेच कळत नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. सध्याची राज्यात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झाला आहे. काँग्रेस मात्र गर्भगळित झाली आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
ओबीसी आरक्षण हा कांगावा आहे. शिवसेनेला मुंबईत कुणालाही सोबत घ्यायचं नाही. पुण्यात राष्ट्रवादीला सोबत कुणी नकोय, नागपूरमध्ये काँग्रेसला कुणी सोबत नकोय. या सगळ्यांची युती होणार नाही. त्यामुळे आपआपलं कोंबडं सगळे पक्ष झाकून ठेवत आहेत. ओबीसी आरक्षणाचं फक्त नाव दिलं गेलं आहे. मात्र यामुळे निवडणुका लांबणार नाहीत. इलेक्शन न घेणं फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे इलेक्शन घेतल्या जातीलच असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरेंबाबतही भाष्य
राज ठाकरेंमुळे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत पण भाजपच्याही अडचणी वाढल्या आहेत. त्यांनी जो फ्रँकेस्टाईन उभा केला तो त्यांनाही खाऊ लागला. त्यामुळेच १ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली आणि त्या सभेत बाबरी कशी पाडली याचं वर्णन केलं. आता राज ठाकरे यांनी जर व्यवस्थित पावलं टाकली तर त्यांचे प्रत्येक महापालिकेत किमान ४ ते ५ नगरसेवक असतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जरी वातावरण ढवळलं असलं तरीही मी बहुजन समाज आणि ओबीसी समाजाचं अभिनंदन करतो. कारण राजकीय नेत्यांनी धार्मिक वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला प्रतिसाद या समाजाने दिला नाही. आम्ही दंगल करणार नाही, आम्ही धार्मिक तेढ निर्माण करणार नाही हा सर्वात मोठा संदेश मला वाटतो आहे. लोक धार्मिक राहतील का? तर १०० टक्के. पण धर्माच्या नावाने जी दंगल होते त्याला आता लोक कंटाळलेत ही सर्वात जमेची बाजू आहे असं मला वाटतं.
राणा दाम्पत्याविषयी काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
राणा दाम्पत्य हे स्वतःचा TRP वाढवण्याठी सगळ्या गोष्टी करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणणं, आता पुन्हा एकदा महाआरती करणार असं म्हणणं हे सगळं टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न आहे. मुलुंड येथील कोर्टात मिसेस राणांच्या विरोधात खोटा दस्तावेज सादर करून खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गुन्हा महाराष्ट्र सरकारनेच केला आहे आणि हा गुन्हा भाजपनेच दाखल केला आहे. आता त्यांची जी काही धडपड सुरू आहे ती तुरूंगात जावं लागू नये म्हणून चालली आहे. त्यामुळे बचावासाठी हे वेगवेगळे मार्ग ते शोधत आहेत. हनुमान चालीसा हा त्यातलाच एक प्रकार आहे. मी या सगळ्याला देखावा एवढंच म्हणेन असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.