
मुंबई: महाराष्ट्राचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन कांजूरमार्गला जागा दिली होती. आता पुन्हा ती स्थगिती उठवून मेट्रो कारशेड हे आरेमध्येच होणार अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता पुन्हा संतापाची लाट उसळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागच्या वेळी अनेक लोकांनी 'सेव आरे'च्या नावाखाली आंदोलन केले होते, त्यामध्ये अनेकांना अटकही झाली होती.
काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले आहे. आरे कारशेडचा मुद्दा पुढे आणला जातो आहे. तो आणून मुंबईच्या काळजात खंजीर खुपसू नका असं कळकळीचं आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख तसंच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आरेमध्ये मेट्रोचं कारशेड उभारलं तर वन्यजीव धोक्यात येतील असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आता उद्धव ठाकरेंच्या या आवाहनानंतर मनसे प्रमुख राज ठाकरेंचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आरेच्या मेट्रो कारशेडला विरोध दर्शवला आहे. तसं पत्रही त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना लिहिले आहे.
अमित ठाकरे पत्रात काय म्हणाले?
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होई नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं...
आपल्याला विकाल हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. ही आग्रहाची विनंती.