
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या बीकेसीमधील सभेत बोलताना भाजपवर तुफान टीका केली आहे. आपल्या या संपूर्ण भाषणात त्यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली होती. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बरेच टोमणे लगावले आहेत.
जेव्हा बाबरी मशिद पाडली गेली तेव्हा आपण स्वत: तिथे होतो असा दावा फडणवीसांनी यावेळी केला होतं. त्यांच्या याच दावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही चढायचा जरी प्रयत्न केला असता ना तर नुसत्या तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती.' असा टोमणा लगावत मुख्यमंत्र्यांनी बोचरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय केली टीका?
'बरं हे म्हणतात की, बाबरीच्या वेळेस शिवसैनिक नव्हतेच. मी गेलो होतो तिकडे.. अरे तुमचं काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेला होतात? की कॉलेजची सहल होती. चला.. चला.. अयोध्येला चला.. असं काय होतं की, बाबरी बघायला चला. काय तुमचं वय बोलता किती. करता काय.'
'तुम्ही जर आमच्यावर शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो की, तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलं आहे? बाबरी तर पाडली नाहीच. तुम्ही चढायचा प्रयत्न केला असता ना तर नुसत्या तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती.'
'तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता ना तर नुसत्या तुमच्या वजनानेच बाबरी खाली आली असती. म्हणजे लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही नुसता प्रयत्न.. एक पाय टाकला असता तर बाबरी खाली आली असती. पण आता हे म्हणतात की ती मशिद नव्हती तर तो ढाचा होता.'
'अच्छा... मग तेव्हा एवढं सगळं टिपेला का गेलं होतं? मंदिर पाडलं मशिद बांधली म्हणे.'
'मला आठवतंय.. मी साक्ष आहे. सगळ्यांना लाखोंच्या संख्येने अयोध्येला बोलावलं होतं. त्यात शिवसैनिकपण होते. अडवाणींचा तो मुलाखतीचा व्हीडिओ पण आहे. त्यांनी सांगितलं होतं की, ती जी लोकं चढली होती. ती मराठी बोलत होती. म्हणून मी प्रमोदला सांगितलं की, जा जरा बघून ये. प्रमोद गेला पण त्यांनी प्रमोदचं देखील ऐकलं नाही. प्रमोदचं देखील न ऐकणारी अशी मराठी माणसं कोण होती?'
'तो सगळा दिवस आणि प्रसंग मला आजही आठवतो. टीव्हीवर मी बातमी बघत होतो. लोकं चढले आणि बाबरी पडली. मी धावत वर गेलो आणि बाळासाहेबांना सांगितलं की, बाबरी पाडली.. साहेब म्हणाले की, काय सांगतो.. बाबरी पाडली. अरे वा.. तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. कोणाचा तरी फोन होता. ते एवढंच म्हणाले.. चांगलं आहे की, मग.. जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे.'
'फोन ठेवल्यावर म्हणाले ही कसली यांची अवलाद. लोकांना करांना बोलावतात कार सेवा.. कार सेवा करा. हे असलं नेतृत्व पुचाट नेतृत्व आहे. लोकांना भडकावून त्याने केलेलं काम केल्यानंतर जो जबाबदारी झटकतो तो नेता नाही. हेच काम भाजपने केलं आहे.'
'तेव्हा सुंदरसिंग भंडारी बोलले होते की, हे काम आमचं नाही. हे कदाचित शिवसैनिकांनी केलं असेल. मग तेव्हा बोंबलात का नाही? तेव्हा भोंगा होता ना. तो भोंगा वाजवला का नव्हता. मी होतो.. मी होतो.. पुन्हा येईन.. पुन्हा येईन.. पुन्हा येईन..' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
आता उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस हे कशा पद्धतीने उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.