
मुंबई: काल झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत भाजपच्या तीन उमेदवारांनी बाजी मारली. केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक हे भाजपचे तीन उमेदवार निवडून आले. त्यानंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या, आमदारांच्या प्रतिक्रिया आल्या. शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय पवारांच्या पराभवाचे खापर थेट अपक्ष आमदरांवरती फोडले. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार, देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे यांनी शब्द देऊनही मतदान केले नसल्याचा आरोप संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
त्याला आता अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, आणि संजय शिंदे यांनी उत्तर देत आरोप फेटाळले आहेत. आमच्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत, संजय राऊत ब्रह्मदेव आहेत का? मी नेत्यांना सांगून उघडपणे मतदान केलं आहे. संजय राऊतांनी असे जर आमच्यावर आरोप केले तर येत्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगळा निर्णय घेऊ किंवा तटस्थ राहण्याची भूमिका घेऊ, असा धमकीवजा इशारा मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला आहे.
देवेंद्र भुयार माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी मतदानाला जाताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील यांना सांगून मतदान केले, त्याचबरोबर बाहेर आल्यावरही सांगतिले की मी महाविकास आघाडीला मतदान केले आहे, तरीही संजय राऊत असा आरोप करत असतील तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
दुसरे अपक्ष आमदार म्हणजे संजय शिंदे यांचे नावही संजय राऊतांनी घेतले होते. त्यांनीही आपली बाजू मांडली आहे. संजय शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की संजय राऊतांचे आरोप चुकीचे आहेत. मी ज्यावेळी महाविकास आघाडी स्थापन होत होती तेव्हाच पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीच्या जेवढ्या बैठका झाल्या तेवढ्या बैठकांना आम्ही हजर होतो. आम्हाला ज्याप्रमाणे सुचना करण्यात आल्या त्याप्रमाणे आम्ही शिवसेनेला मतदान केले आहे. मला दिलेल्या चिठ्ठीत पहिले नाव हे संजय पवारांचे होते आणि दुसरे नाव हे संजय राऊतांचे होते असे आमदार संजय शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान संजय राऊतांनी ज्या अपक्ष आमदारांचे नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यातील दोन आमदारांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सकाळी माध्यामांशी बोलताना संजय राऊत म्हणाले होते ज्यांनी आम्हाला शब्द देऊनही भाजपला मतदान केले अशा आमदारांची नावं आली आहेत...त्यांना पाहून घेऊ. त्यानंतर अपक्ष आमदारांनी पुढे येऊन आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सकाळीच म्हणाले होते की शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना धमक्या दिल्या जात आहेत.