बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या गाड्यांवर दगडफेक DCM फडणवीसांचा CM बोम्मईंना फोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बेळगांव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादा आंदोलनाने आता हिंसक वळण घेतलं आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये येऊ न देण्याची भूमिका घेतलेल्यानंतर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं आज दुपारी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्र पासिंगच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

कन्नड रक्षण वेदिके संघटनेचे संस्थापक नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं. तसंच हिरबागेवाडी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या सहा वाहनांवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. दरम्यान, या हिंसाचारानंतर कर्नाटक पोलिसांनी नारायण गौडांना ताब्यात घेतलं आहे.

फडणवीसांचा बोम्मईंना फोन :

तर या हिंसाचारानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी बेळगावनजीक हिरेबागवाडी येथे झालेल्या घटनांबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी नोंदविली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

फडणवीसांच्या फोनवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीही या घटनांमध्ये लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं. तसंच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केलं.

या सर्व राड्यानंतर आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका, अशी मागणी करणारं एक निवदेन देण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 144 कलम लागू असताना देखील अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येनं निवेदन देण्यासाठी एकत्र जमणं चुकीचं असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे. या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यासाठी आलेल्या सर्व नेते मंडळींना ताब्यात घेण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

उपमुख्यमंत्र्यांच्या फोनचा उपयोग झाला नाही :

दरम्यान, या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, अपेक्षा ही होती की, काही तरी पुढाकार घेऊन दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्थिती निवळण्यासाठी काळजी घेणं आवश्यक होतं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी संपर्क साधला असं मला त्यांनी स्वत: सांगितलं आहे. चांगली गोष्ट आहे पण त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही.’

ADVERTISEMENT

विशेषत: आज महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये जाणाऱ्या वाहनांवरील हल्ल्यांमुळे एक प्रकारे भीतीचं वातावरण या सगळ्या परिसरात झालेलं आहे. हे वेळीच थांबलं नाही तर एक संयमाची भूमिका महाराष्ट्राने घेतली आहे. अजूनही घ्यायची तयारी आहे. पण त्या संयमाला सुद्धा मर्यादा असतात. येत्या 24 तासामध्ये या वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर या संयमाला वेगळं वळण लागू शकतं. तशी परिस्थिती निर्माण झाली तर याची जबाबदारी ही कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कर्नाटक सरकार यांच्यावरच पूर्णपणाने राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिंमत दाखवावी :

या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले, मराठी भाषक बेळगाव भागात महाराष्ट्राच्या गाड्यांवर कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! महाराष्ट्राच्या गाड्यांवर हल्ला महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला आहे. अशा हल्ल्यातून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. असे भ्याड हल्ले महाराष्ट्र सरकारनं खपवून घेऊ नयेत.

महाराष्ट्र सरकार आणि सत्तारूढ पक्षांनी नेभळटपणा, बोटचेपी भूमिका सोडावी. निव्वळ निषेध करून चालणार नाही. ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची हिम्मत महाराष्ट्र सरकारनं दाखवावी. कर्नाटक सरकारच्या पाठींब्यामुळेच हे प्रकार घडत आहेत.

महाराष्ट्र सरकारनं यासंदर्भात कणखर भूमिका घ्यावी. केंद्र सरकारनं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना समज द्यावी. मराठी माणसांच्या रक्षणासाठी, अस्मितेसाठी विरोधी पक्ष आणि महाराष्ट्र अभिमानी नागरिक एकजूटीनं सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सत्तारुढ पक्षांनी देखील आपलं कर्तव्य पार पाडावं. कोणत्याही परिस्थितीत सीमाभागात अनुचित प्रकार आणि भ्याड हल्ले खपवून घेऊ नयेत. महाराष्ट्राची एकजूट दाखवण्याची हीच वेळ आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT