
मुंबई: केंद्रातील मोदी सरकारने लष्करातील भरतीसाठी 'अग्निपथ' ही जी नवी कंत्राटी योजना सुरु केली आहे त्यावरुन संपूर्ण देशात आता रणकंदन माजलं आहे. या योजनेला विरोध करताना अनेक राज्यांमध्ये हिंसक आंदोलनं सुरु झाली आहे. असं असताना दोनच दिवसांपूर्वी राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी याच योजनेबाबत एक दावा केला. पण त्यांचा दावा साफ चुकीचा असल्याचं आज स्पष्ट झालं आहे. कारण यापुढे लष्करात भरती ही फक्त 'अग्निवीर'च्या माध्यमातूनच होईल असं लष्कराने आज (19 जून) घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता की, फक्त अग्निपथ योजनेतून लष्कराची भरती होणार नाही. अग्निपथ योजना ही तर अतिरिक्त योजना आहे. रेग्युलर भरती तर सुरुच राहणार आहे.
मात्र, लष्कराच्या तीनही दलाच्या उच्च अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, यापुढे लष्करातील सगळ्या भरती या अग्निवीरच्या माध्यमातूनच होतील.
'लष्करातील भरती फक्त अग्निवीरच्या माध्यमातूनच होणार'
लष्कराच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं जाणून घ्या सविस्तर:
प्रश्न: अनेक तरुणांनी लष्करी भरतीच्या परीक्षा पास केल्या होत्या. अनेकांच्या वैद्यकीय चाचणी झाल्या होत्या, काही जण फक्त कॉल लेटर येणार याची वाट पाहत होते. या सगळ्या परीक्षार्थींचं काय होणार?
उत्तर: (सूरज झा, एअर मार्शल)- आमची भरती प्रकिया सगळ्यात पुढे गेली होती. जेव्हा हे रोखण्यात आलं. आता सर्व भरती ही अग्निवीरच्या माध्यमातूनच होईल. वयाची मर्यादा वाढविण्यात आली आहे. 21 वर्षाऐवजी 23 वर्षापर्यंत करण्यात आली आहे. जे पात्र आहेत त्यांना अग्निवीरची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये त्यांना अर्ज करावा लागेल. दोन वर्ष हा एक मोठा काळ असतो. अशा परिस्थितीत या सर्वांची पुन्हा तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच त्यांची वायूदलात निवड होईल.
मी पुन्हा सांगतोय की, सर्व भरती या अग्निवीरच्या माध्यमातूनच होईल. जो पात्र आहे त्याला या प्रोसेसमध्ये पुन्हा अर्ज करावा लागेल.
आता जाणून घेऊयात 16 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नेमका काय दावा केला होता?
देवेंद्र फडणवीस यांचा नेमका काय दावा काय होता?
केंद्राने अग्निपथ योजना जाहीर करताच याबाबत तरुणांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. याच दरम्यान 16 जून रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये त्यांना अग्निपथ योजनेला लोकं विरोध करत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा फडणवीसांनी अतिशय आत्मविश्वासाने असं उत्तर दिलं होतं की, अग्निपथ योजना ही अतिरिक्त योजना आहे. रेग्युलर भरती ही बंद झालेली नाही.
पाहा देवेंद्र फडणवीस यांची नेमकी प्रतिक्रिया काय होती:
'फार थोड्या लोकांनी विरोध केला आहे अग्निपथ योजनेला. ज्या लोकांना विरोध केला आहे त्यांनी गैरसमजुतीतून विरोध केला. त्यांना असं वाटलं की, रेग्युलर भरती बंद होऊन आता केवळ अग्निपथ योजनेच्या अंतर्गत भरती होणार आहे. या उलट अग्निपथ ही अतिरिक्त योजना आहे.'
'अग्निपथ योजनेमध्ये चार वर्षापर्यंत त्यांना सैनिकी शिक्षण घेता येणार आहे. सैनिकांचं काम करता येणार आहे 21 वर्षाच्या आतल्या वयोगटातील मुलांना हे करायचं आहे. त्यांना खूप मोठ्या प्रमाणात रिमूनेशनर मिळणार आहे. 4 वर्षानंतर लम्पसम अमांउट देखील मिळणार आहे. त्यातील जे सैन्यात जाण्यास इच्छुक असतील अशा लोकांना सैन्यात प्राधान्यही मिळणार आहे.'
'रेग्युलर भरती काही बंद केलेली नाही. अग्निपथ ही योजना अतिरिक्त आहे. आमच्याकडे सैनिकी बाणा तरुणांमध्ये निर्माण झाला पाहिजे याकरिता तयार केलेली योजना आहे. ज्या लोकांना ते लक्षात आलं नाही अशा काही लोकांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली. पण आता जसजसं त्याबाबत समजत चाललं आहे तसं लोकं त्याचं मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत करत आहेत.' अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
दरम्यान, आता लष्काराने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, देवेंद्र फडणवीस यांचा दावा हा साफ चुकीचा आहे. कारण यापुढे नियमित भरती होणार नसून जी काही भरती होईल ती फक्त आणि फक्त अग्निवीरच्या माध्यमातूनच होणार आहे. त्यामुळे आता सगळ्याबाबत तरुणांना नेमकं काय वाटतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.