Devendra Fadnavis : '२०१९ ला पाठीत खंजीर खुपसला गेला, आता शिवरायांच्या गनिमी काव्याने आणलं सरकार'

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात अत्यंत भव्य सत्कार
Deputy Cm Devendra Fadnavis Rally in Nagpur
Deputy Cm Devendra Fadnavis Rally in Nagpur

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

२०२४ ला पूर्ण बहुमताचं सरकार आणणार आहे ही महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये (Nagpur) केली. महाराष्ट्रात राज्य कोण चालवत आहे हेच इतके दिवस समजत नव्हतं. मात्र आज एक दमदार सरकार आलं आहे. या महाराष्ट्राला, विदर्भाला प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून देण्याचं काम हे सरकार करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारं सरकार आता आलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने तसंच निधड्या छातीने हे सरकार आपण महाराष्ट्रात आणलं आहे असंही त्यांनी नागपूरमधल्या रॅलीत बोलताना स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते नागपूरला गेले. तिथे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

२०१९ ला आपल्यासोबत बेईमानी झाली, पाठीत खंजीर खुपसला गेला. मात्र आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने आणि निधड्या छातीने आपण आपलं सरकार परत आणलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सामान्य माणसाच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना-भाजप युतीचे सरकार नव्याने राज्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नीतीवर चालणारं आपलं सरकार होतं मात्र आपली फसवणूक करण्यात आली आहे. आता आपली अडीच वर्षे पूर्ण करूच पण २०२४ लाही पूर्ण बहुमताचं सरकार महाराष्ट्रात आणल्याशिवाय शांत बसणार नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

उपमुख्यमंत्रीपद कसं मिळालं? (Devendra Fadnavis)

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील हे जाहीर केल्यानंतर मी पत्रकार परिषदेत हे जाहीर केलंहोतं की मी या सत्तेत सहभागी होणार नाही. मी तशी घोषणाही केली होती. मात्र पत्रकार परिषदेतून घरी गेल्यानंतर आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केलं की मी उपमुख्यमंत्री होणार. त्यानंतर अमित शाह यांनीही हेच सांगितलं. त्यानंतर माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं. त्यांनीही मला हे सांगितलं की तू १०६ लोकांचं प्रतिनिधित्व करतोस त्यामुळे तू या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलं पाहिजे. ज्यानंतर मी सरकारमध्ये सहभागी झालो असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदीजी होते म्हणून माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकला. तसंच ४० वर्षांनी पूर्ण पाच वर्षे मुख्यमंत्रीपद माझ्याकडेच राहिलं. त्यामुळे पक्षाचा आदेश पाळायचा असतो. पक्षाने मला घरी बसायला सांगितलं असतं तर आनंदाने घरीही बसलो असतो. आता पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती पूर्ण करणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

भाजप तसंच शिवसेना यांची २०१४ ला युती झाली होती तेव्हाही हेच बोललं जात होतं की हे सरकार ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ चालणार नाही. आत्ताही तेच बोललं जातं आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. शिंदे-फडणवीस सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल ही ग्वाहीही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिली. देवेंद्र फडणवीस हे ३५ दिवसांनी नागपूरमध्ये गेले. त्यावेळी त्यांचा भव्य सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तसंच एका विशेष रथावर ते होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही होत्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in