'माझ्यावर 14 केसेस केल्या, मी का क्रिमिनल आहे का? आता महाभारत होणार! महाडिकांचा इशारा

भाजप राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली.
Dhananjay mahadik on satej patil
Dhananjay mahadik on satej patil

भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरचे नेते धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. कोल्हापूर येथे जन्माष्ठमीनिमित्त आयोजित दहीहंडी स्पर्धेत ते बोलत होते. विरोधकांकडून आमचं ठरलय म्हणत 2019 च्या लोकसभेत दगाफटका केला. त्यानंतर कपटनीतीने आम्हाला त्रास देण्याचं काम विरोधकांनी केलं, असं महाडिक म्हणाले. तसेच यापुढे महाभारत घडणार, असा इशारा देखील महाडिकांनी आपल्या विरोधकांना दिला.

'अडीच वर्ष मला त्रास देण्याचं काम केलं'- महाडिक

गेल्या अडीच वर्षात सत्ता असताना माझ्यासह कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच आमचे उद्योग धंदे, कारखाने, शिक्षण संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न विरोधक नेत्यांनी केला, असं महाडिक म्हणाले. माझ्यावर 14 केसेस दाखल केले, मी का क्रिमिनल आहे का? असा प्रश्न त्यांनी विचारला. महाविकास आघाडीचं सरकार असताना आपल्याला त्रास देण्याचं काम केलं, असा दावा महाडिकांनी यावेळी बोलताना केला.

'आता महाभारत होणार'- धनंजय महाडिक

मी म्हणालो होतो सूर्य मावळला आहे पण एकेदिवशी उगवणार. सत्ता आमच्याकडे आली तर तुम्हाला झेपणार नाही, असं मी बोललो होतो. आता आमची सत्ता आली आहे. आम्ही कूटनीतीने वागणार नाही, पण इथून पुढे महाभारत होणार. वाईटाचा नाश होणार आहे , असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. हा अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते सतेज पाटलांना महाडिकांनी टोला लगावला.

महाडिकांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील विकास कामांची हमी

भाजप आणि शिंदे गटाचे सरकार साडेसात वर्षे सत्तेत राहणार आहे. त्यामुळं चुळबुळ करणाऱ्यांचं काहीही चालणार नाही. कोल्हापूर जिल्ह्याचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. कोल्हापूरसाठी खंडपीठ, बास्केट ब्रिज, विमानतळाचे प्रश्न, गडकोटांची दुरुस्ती, तीर्थक्षेत्रांच्या आराखडा यासह जिल्ह्यातील विविध कामं मार्गी लावण्याचं आश्वासन महाडिकांनी दिलं. शिवाय येणाऱ्या काळात महापालिका, जिल्हा परिषद. नगरपालिकांमध्ये फक्त भाजप आणि शिंदे गटाचं वर्चस्व दिसेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान कोरोना संसर्ग आणि महापुरामुळे गेले तीन वर्ष दहीहंडीचा थरार रंगला नव्हता. मात्र तीन वर्षांच्या खंडानंतर धनंजय महाडिक युवा शक्तीकडून दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपने धनंजय महाडिकांना राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली होती आणि त्यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला होता. यावर बोलताना महाडिक म्हणाले, राज्यसभेत निवडणुकीत पाच थर लावले होते, भाजपने धनंजय महाडिकांच्या रूपात सहावा थर लावून हंडी फोडून गड यशस्वी केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in