Eknath Shinde: "माझ्यासोबत 50 हून अधिक आमदार, लवकरच राज्यपालांची भेट घेणार''

महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 12 बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
Eknath Shinde: "माझ्यासोबत 50 हून अधिक आमदार, लवकरच राज्यपालांची भेट घेणार''
Eknath ShindeMumbai Tak

मुंबई: महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या 12 बंडखोर आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर गुवाहाटीत बसलेले एकनाथ शिंदे शांत कसे बसतील त्यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. मुंबई तकशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) स्वतः अल्पमतात असल्यामुळे ते आम्हाला अपात्र ठरवू शकत नाही. शिवसेनेच्या नोटिसांना आपण घाबरत नाही, हवे असल्यास अशा आणखी 10 नोटिसा पाठवाव्यात, असेही शिंदे म्हणाले.

आमच्याकडे शिवसेनेच्या 37 हून अधिक आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आम्हाला फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे शिंदे म्हणाले. शिंदेंनी शिवसेना आणि अपक्ष पकडून आपल्यासोबत 50 आमदार असल्याचा दावा केला आहे.

''उद्धव ठाकरेंचा आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न''

'मुंबई तक'शी बोलताना शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे आम्हाला अपात्र ठरवू शकत नाहीत. ते फक्त आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. नियमानुसार आम्ही योग्य असल्याचे शिंदे म्हणाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांचा पाठिंबा आहे. याचा अर्थ मी विधिमंडळ पक्षाचा नेता आहे. आम्हाला कोणीही घाबरवू शकत नाही, वेळ आल्यावर कायदा आम्हाला साथ देईल, असे शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या पत्राला शिंदेचा पलटवार

काल उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 बंडखोर आमदारांना निलंबीत करण्याचं पत्र विधानसभा उपाध्यांना लिहिले होते. दुसरीकडे, शिंदे यांनी मी विधिमंडळ पक्षनेता आहे आणि आमच्या पक्षाचे प्रतोद भरत गोगावले असल्याचे पत्र नरहरी झिरवाळ आणि राज्यपालांना लिहिले. त्या पत्रावर शिवसेनेच्या 37 आमदारांच्या सह्या आहेत.

''लवकरच राज्यपालांची भेट घेणार''

लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट घेणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पण त्याची वेळ अजून निश्चित झालेली नाही. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरही (धनुष्यबाण) शिंदे गट दावा करणार का? त्यावर शिंदे यांनी नंतर निर्णय होईल, असे सांगितले.

शरद पवार ज्येष्ठ नेते

शरद पवार यांनी काल बंडखोर आमदारांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. यावर शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करायचे नाही.

बंडात भाजपचा हात आहे का?

या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, नाही तसे नाही. आणखी आमदारही आपल्यासोबत येणार असल्याचा दावा शिंदे यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या कालच्या वक्तव्यावरून भाजप आपल्यासोबत असल्याचा दावा केला जात होता. त्यावर आता शिंदे यांचे स्पष्टीकरणही आले आहे. शिंदे म्हणाले की, मी महाशक्तीला राष्ट्रीय पक्ष म्हटले नव्हते. ही महासत्ता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आहे.

शिंदे गट होतोय अधिक मजबूत

बंडखोर आमदारांचा गट मजबूत होताना दिसत आहे. दोन अपक्ष आमदार शिंदेंच्या छावणीत दाखल झाले आहेत. अशाप्रकारे शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकनाथ शिंदे यांना 46 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. आता तीन आमदार सामील झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in