'एकनाथ शिंदे लवकरच आपल्यामध्ये असतील', मुख्यमंत्री ठाकरेंना ठाम विश्वास

शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन थेट गुजरात गाठले आहे, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य समोर आलं आहे
'एकनाथ शिंदे लवकरच आपल्यामध्ये असतील', मुख्यमंत्री ठाकरेंना ठाम विश्वास
Eknath Shinde | Uddhav Thackeray@Twitter

मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करुन थेट गुजरात गाठले आहे. आपल्यासोबत ३५ आमदार आहेत असा दावा देखील शिंदेंनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांनी प्रस्ताव दिला आहे. राज्यात हा राजकीय भूकंप उडताच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आमदार खासदारांची बैठक बोलवली आणि आपल्या नेत्यांना त्यांनी कानमंत्र दिला आहे. उद्धव ठाकरेंनी आमदारांना आवाहन केले आहे.

तुमचं काही नाही, माझं काही-नाही तर भाजपसोबत जायचं कशाला?. आता बोलत आहेत की भाजपसोबत चला…जेव्हा भाजपसोबत होतो तेव्हा आपल्याला कमी त्रास झाला का? मग आता भाजपसोबत कसं जायचं? असे सवाल मुख्यमंत्र्यांनी आपल्या आमदार खासदारांना विचारले आहेत.

पुढे मुख्यमंत्री म्हणाले की आपण एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) समजवण्याचा प्रयत्न करत आहोत. ते माझं ऐकतील हा मला पुर्ण विश्वास आहे, ते लवकरच आपल्यामध्ये असतील. राष्ट्रवादी- काँग्रेस आपल्या सोबत आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाले आहेत. काही वेळापुर्वी महाविकास आघाडीची एक बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थीत होते. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत आहे असे दोन्हीही पक्षाचे नेते म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?

मिंलिद नार्वेकर यांनी थेट सूरतमधील ला मेरिडियन हॉटेल गाठून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यानंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे यांचं बोलणं करुन दिलं. साधारण 20 मिनिटं एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. यावेळी सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबतची सत्ता सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी अट घातली. यावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना मुंबईत येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं.

यावर मुख्यमंत्र्यांना शिंदेंनी सांगितलं की, माझ्याकडे 35 आमदार आहेत. जर आपण भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच आपण शिवसेनेत कायम राहू. मी या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे विचार करा आणि काय ते मला कळवा. असं एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितलं आहे.

'मी पक्ष सोडलेला नाही, कोणताही पक्ष स्थापन केलेला नाही. कोणत्याही कागदावर सही केलेली नाही. पक्षाच्या विरोधात बोलललो नाही. असं असताना विधिमंडळाच्या गटनेते पदावरुन का काढण्यात आलं?' असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

तसंच यावेळी एकनाथ शिंदे यांनी असंही सांगितलं की, 'मी मुख्यमंत्री पदाबद्दल देखील काही बोललेलो नाही. माझी भूमिका एवढीच आहे की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन व्हावं. ती मी मांडली तर त्यात गैर काय?'

तसंच एकनाथ शिंदे यांनी काही शिवसेना नेत्यांबद्दलही तक्रारी केल्या. त्यात प्रामुख्याने त्यांनी संजय राऊत यांच्याविषयी त्यांनी तक्रार केली आहे. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, 'राऊत यांनी मला फोन केले माझ्याशी व्यवस्थित बोलत आहेत पण ते जेव्हा प्रसार माध्यमांपुढे बोलत आहेत तेव्हा ते माझ्यावर टीका करत आहेत.' अशा स्वरुपाची चर्चा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाली असल्याचं समोर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in