
उस्मानाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबाबत विकृत पोस्ट शेअर करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale)वर अटकेची कारवाई झालेली आहे. अनेक राजकीय पक्षांनी तिच्याच्या या कृतीचा निषेध केलेला आहे. असं असताना फडणवीस सरकारमधील माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)यांनी मात्र केतकी चितळे हिचं समर्थन केलं आहे. ते उस्मानाबादमध्ये बोलत होते.
'केतकी चितळे ही कणखर आहे, तिला मानावं लागेल.' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेला एक प्रकारे आपला पाठिंबाच असल्याचं म्हटलं आहे.
'मला वाटतं केतकी चितळे कणखर आहे, तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रात तिला कुणाची गरज नाहीए. तिला मानावं लागेल की, उच्च न्यायालयात वकील न देता बिचारीने स्वत:ची बाजू स्वत: मांडली.' असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका केली आहे.
सदाभाऊ खोतांकडून केतकी चितळेचं समर्थन, पाहा काय नेमकं म्हणाले
'हा (अमोल मिटकरी) भाषणामध्ये ब्राम्हण समाजाला टार्गेट करतो खालच्या पातळीवर जाऊन बोलतो. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे घसरलेली होती? आणि आजच कुठे तुमची नैतिकता उफळून आली. देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना तुमच्या जिभेला हाड नव्हतं? तेव्हा तुम्हाला थोर-मोठ्यांचा अपमान करु नये असं वाटत नव्हतं का?'
'जर समोरून दगड आला असेल तर त्याच्या अंगावर दगड पडतात त्याने काय गुहेत जाऊन लपून बसायचं? म्हणजे जाहगिरदारानं काही केलं तर माफ, पण गरीबानं केलं तर तो गुन्हा. जाहगिरदारानं केलं तर ती कर्तबगारी. हे पारंपारिक चालत आलेलं आहे.'
'मला वाटतं केतकी चितळे कणखर आहे, तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रात तिला कुणाची गरज नाहीए. तिला मानावं लागेल. की, उच्च न्यायालयात वकील न देता बिचारीने स्वत:ची बाजू स्वत: मांडली. ज्या वेळी तिने ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांची टीका-टिप्पणी बघा. त्यांच्या कमेंट बघा. काय कमेंट आहेत तुमच्या.'
'म्हणजे तुम्ही केलं तर पाटलाच्या पोराने केलं आणि दुसऱ्यानं केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. प्रत्येकाला स्वाभिमान आहे.'
'प्रस्थापितांनी नेहमी विस्थापितांवर अन्याय केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो आमचा लढा हा वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आम्हाला वाडे पाडायचे आहेत.' अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली आहे.
सदाभाऊ खोत यांनी थेट आणि उघडपणे केतकी चितळे हिचं समर्थन केलेलं असल्याने आता यातून नव्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे याविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आता काय भूमिका मांडणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.