
सोलापुर: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. परंतु परब बाहेर असल्याने त्यांनी वकीलामार्फत आपले म्हणणे पाठवले आहे. आता परंबांच्या चौकशीवरती राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी खास आपल्या शैलित अनिल परबांवरती निशाणा साधला आहे.
सदाभाऊ खोतांनी खास आपल्या शैलीत अनिल परबांना आलेल्या ईडीच्या नोटीसवरती प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्याकडे ईडी चौकशीला जाते ते भाग्यवान माणसे आहेत. कारण लक्ष्मी सोनपावलाने त्यांच्या दारात अवतरली आहे. लक्ष्मी ज्यांच्या घरी सोनपावलाने अवतरली त्याच्याकडे ईडीने जावे म्हणजे कोण कोण वेडे आहेत ते महाराष्ट्राला कळेल.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि शिवसेनेची बाकी सर्व मंत्री, नेते, पदाधिकारी आज अयोध्येमध्ये गेलेले आहेत. सरकारने जनतेच्या प्रश्नावर बोलायला पाहिजे पण मुख्यमंत्री घरात बसतात आणि युवराज देश वाऱ्या करत असतात. आज ते अयोध्येच्या स्वारीवर गेलेत. ज्यांनी अयोध्येच्या मंदिराच्या वर्गणीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले आणि गोंधळ घातला.
ज्यांनी राम मंदिर बांधायची यांच्यात हिम्मत नाही असे म्हणाले तेच आता आयोध्येला निघाले आहेत, म्हणजे यांना रामाचाही जप करायचा आहे आणि कॉंग्रेस वगैरे आहेत त्यांना हिरवे झेंडे खांद्यावर घेऊन नाचायचे आहे. एका म्यानात दोन तलवारी राहतील कश्या? आता त्या राहू शकत नाहीत. मग तुम्ही रामाला जावा नाहीतर काशीला जाऊन आंघोळ करा. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
सदाभाऊ खोतांनी यावेळी काल देहुमध्ये अजित पवारांबाबत घडलेल्या घटनेवर आपेल मत व्यक्त केले आहे. मला या लोकांचे हसू येते, काही घडले की महाराष्ट्राचा अपमान होतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताहेत हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? तुमची संपत्ती, तुमचा सातबारा महाराष्ट्राच्या नावावर करा बघू तुमची दानत आहे का?. मला वाटते महाराष्ट्राचा बिलकूल अपमान झालेला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते हे सुप्रिया ताई विसरलेल्या आहेत असा टोलाही सदाभाऊ खोतांनी लगावला आहे.
सुप्रिया ताईंनी तो शपथविधी आठवावा मग त्यांच्या लक्षात येईल की प्रोटोकॉलप्रमाणे झाले की नाही. प्रोटोकॉलप्रमाणे आधी मुख्यमंत्री बोलतात आणि मग उपमुख्यमंत्री त्यात वावगं काय? अजितदादा आणि देवेंद्रजी एकत्र तेव्हा महाराष्ट्रात त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून बघतो, असेही सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.