
महाराष्ट्रात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठं बंड पुकारलं आहे. त्यामुळे राजकीय भूकंप आला आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुढे घेऊन जात आहोत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्हाला पुढे घेऊन जायची आहे. मुंबई तकशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे ४६ आमदारांचं बळ असल्याचा दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
शिवसेनेचे आमच्याकडे ३७ आमदार आहेत, तर ९ अपक्ष आमदार आहेत असं एकूण ४६ आमदार आमच्यासोबत आहेत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पक्षांतर बंदीची कारवाई होऊ नये म्हणून जी आमदारांची संख्या लागते ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ४६ मधले ९ अपक्ष आमदार आहेत.
आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे
आमच्याकडे ३७+९ अपक्ष असं ४६ आमदार आहेत. आमच्यासोबत सगळे आमदार त्यांच्या मर्जीने आले आहेत. कुणालाही आम्ही धाक दाखवून या ठिकाणी आणलेलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमचा संपर्क आहे का? असं विचारलं असता माझा सध्या माझ्या सोबतच्या आमदारांसोबत संपर्क आहे असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. तसंच गुवाहाटीतच का आलात असं विचारलं असता भाजपशासित राज्यात आम्ही का येऊ शकत नाही? असा प्रतिप्रश्न एकनाथ शिंदे यांनी उत्तरादाखल विचारला आहे.
.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाविरोधात म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारलं आहे. शिवसेना सत्तेत असताना आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना पुकारण्यात आलेलं हे सर्वात मोठं बंड आहे. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीचा प्रयोग वेगळा प्रयोग ठरला होता. तसंच महाराष्ट्रातल्या राजकारणातला हा सर्वात मोठा भूकंप आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रातलं सरकार अस्थिर झालं आहे.
विधान परिषद निवडणूक सोमवारी पार पडली. त्यात भाजपचे पाचही आमदार निवडून आले आणि मतांची फोडाफोडी झाल्याचं समोर आलं. ही बातमी ताजी असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं. २१ जून या योग दिनाच्या दिवशी वेगळाच योग साधत शिवसेनेची कोंडी केली. आता या सगळ्या राजकारणात वेगवेगळे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत, अशात आता एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ३७ तर अपक्ष ९ असे एकूण ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे