Ajit Pawar : "दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक, १६५ आमदारांचं पाठबळ तरीही..."

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
Former Deputy cm Ajit pawar criticizes eknath shinde and devendra fadnavis on cabinet expansion
Former Deputy cm Ajit pawar criticizes eknath shinde and devendra fadnavis on cabinet expansion

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तसंच देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. ३० जूनला हा शपथविधी झाला. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

दोघंच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक आहेत का? 165 आमदारांचा पाठिंबा मिळूनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी एवढा वेळ का लागतो आहे असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले अजित पवार?

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होणार, ऐकतोय. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो. राज्यातल्या सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री नेमले गेले तर काम लवकर होतं. सचिवांना, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात. बैठका सुरू होतात, आढावा घेता येतो. सध्या सगळा भार दोघांच्या खांद्यावर आहे. याचं नेमकं कारण काय? १६५ आमदारांचं संख्याबळ मिळालेलं असताना मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी का घाबरत आहेत? घोडं कुठे पेंड खातंय? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे.

राज्यात जेव्हा संकट येतं तेव्हा पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जातात. त्यांनी तिथे थांबलं पाहिजे. एवढंच नाही तर त्यांनी एसपी. कलेक्टर, सीईओ यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेची गरज आहे. असं म्हणत अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराची गरज बोलून दाखवली आहे. आणखी काय म्हणाले अजित पवार ? आपत्ती व्यवस्थापन विभागाला संचालक नेमला जातो. पण अद्याप तो नेमलेला नाही. आपल्याकडे अनेकदा महापूर येतो. पडझड होते. घरं पडतात. तसंच ढगफुटी होऊन तलाव फुटतात. त्यामुळे मदत व पुनर्वसन खात्याला पूर्णवेळ सचिव असणे गरजेचे असते. मात्र अजूनतरी पूर्णवेळ सचिव यांना देता आला नाही. हे त्यांचे अपयश आहे.

दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. त्यांना कोणालाही विचारायचं नाही. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतले पाहिजेत. पण ते निर्णय घेताना दिसत नाहीत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मी सरकारमध्ये असताना पेट्रोल डीझेलवरील टॅक्स सुमारे १० टक्क्यांनी कमी केला होता. त्यावेळी विरोधीपक्षाने हा टॅक्स ५० टक्क्यांनी कमी करा, अशी मागणी केली होती. मग आज ते सत्तेत आले. तेव्हा का नाही ५० टक्क्यांनी कमी केला, तसं केलं असतं तर पेट्रोल १७ रुपयांनी कमी झालं असतं, अशा शब्दात अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in