शिवसेनेच्या पंचायत समिती माजी सभापती 9 दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांनी फिर्यादी पतीला घेतलं ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी तपासाचं लक्ष्य पती सुकांत सावंत यांच्याकडे वळविलं असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Swapnali sawant
Swapnali sawant

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या मागील नऊ दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचं लक्ष्य पती सुकांत सावंत यांच्याकडे वळविलं असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी मिर्या येथील सुकांत सावंत यांच्या घराची झडती घेण्यात आली. तर डॉग स्कॉडमार्फत घरासह नजीकच्या समुद्र किनारा परिसरात सर्च घेण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत स्वप्नाली सावंत यांचा शोध लागलेला नव्हता.

पतीच्या चौकशीने उलटसुलट चर्चांना उधाण

पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांनी स्वप्नाली सावंत यांच्या घर परिसराची पाहणी केली. मात्र आठ दिवसानंतरही स्वप्नाली सावंत सापडलेल्या नसल्याने त्या बेपत्ता झाल्या की घातपात झाला या दृष्टीने पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा शोध सुरू असतानाच आता पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांनाच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

9 दिवस उलटले तरी शोध लागत नाही

स्वप्नाली सावंत आपल्या राहत्या घरातून १ सप्टेंबर पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी स्वप्नाली सावंत यांचा शोध घेतला. परंतु त्या कोठेच आढळून आल्या नाहीत. त्या बेपत्ता होऊन आठ दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यामुळे या प्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी लक्ष घातलं आहे.

बेपत्ता की घातपात?

स्वप्नाली सावंत या नऊ दिवसापूर्वी बेपत्ता झाल्यानंतर त्या नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे ? पती सुकांत सावंत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस तपास करत आहेत, परंतु स्वप्नाली सावंत अद्यापपर्यंत न सापडल्यानं त्या बेपत्ता होण्यामागील गुढ कायम राहिले आहे. त्या बेपत्ता झाल्या की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in