
औरंगाबाद: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, यानंतर राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये सभा घेऊ शकणार नाही कारण औरंगाबादमध्ये कलम 144 लागू असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता सगळ्या चर्चेबाबत औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.
औरंगाबादमध्ये कलम 144 लागू असल्याचा कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. असं औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. पण असं असलं तरीही राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असंही निखिल गुप्ता यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे मनसेची 1 मे रोजी सभा होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
औरंगाबादमध्ये 144 कलम लागू आहे?, पाहा पोलीस आयुक्त काय म्हणाले:
'144 सीआरपीसीचा कोणताही आदेश काढलेला नाही. साधारणत: कलम 37 (1) आणि (3) नुसार आदेश काढत असतो. या आदेशान्वये आम्ही सार्वजनिक ठिकाणी जमा होणारा जमाव किंवा नागरिकांची मूव्हमेंट किंवा लाठी-काठी, हत्यार बाळगणे यावर नियम लावत असतो.'
'ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि वर्षभर अशा प्रकारचे आदेश काढले जात असतात. कुठल्याही प्रकारच्या सभेसाठी किंवा विशिष्ठ कारणासाठी हे आदेश काढले जात नाहीत. ही एक रुटीन ऑर्डर आहे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, 144 चा जमावबंदीचा आदेश औरंगाबाद शहरात काढलेला नाही.'
'कुठल्याही पार्श्वभूमीवर हा आदेश काढण्यात आलेला नाही. समाजात ज्या दैनंदिन घडामोडी ज्या घडत असतात त्या प्रत्येक 15 दिवसांमध्ये ज्या घडामोडी असतात धरणे आंदोलन, मोर्चे, सभा याच्या अनुषंगाने साधारण आमचे आदेश असतात. त्यामुळे हे आदेश काही आता काढलेले नाहीत. तर वर्षभर हे आदेश असतात.'
'राज ठाकरेंच्या सभेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्यावर आम्ही आपल्याला कळवू.' असं पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले.
राज ठाकरेंच्या सभेबाबत दिलीप वळसे-पाटील काय म्हणाले होते?
दरम्यान, मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना राज ठाकरेंच्या सभेबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर वळसे-पाटील म्हणालेले की, 'मनसेच्या सभेच्या संदर्भात औरंगाबादचे पोलीस आयुक्त एक-दोन दिवसात निर्णय घेतील. ते त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. परिस्थिती पाहून औरंगाबाद आयुक्त योग्य तो निर्णय घेतील.'
'काल जी सर्वपक्षीय बैठक झाली त्यात बऱ्याच विषयावर चर्चा झाली आहे. आता जर त्यांना जाहीर सभा घ्यायची असेल तर याविषयी काय करायचं ते औरंगाबादचे पोलीस आयुक्त करतील. याबाबत सरकार निर्णय घेणार नाही. जर कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर सरकार नक्कीच कारवाई करेल.' असंही वळसे-पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.