'अजित पवार जरी आडवा आला, तरी उचला'; उपमुख्यमंत्र्यांची सूचना ऐकून लोक झाले लोटपोट

Ajit Pawar baramati Speech : पोलीस अधिकाऱ्याला सूचना देताच उपस्थितांमध्ये पिकली खसखस
'अजित पवार जरी आडवा आला, तरी उचला'; उपमुख्यमंत्र्यांची सूचना ऐकून लोक झाले लोटपोट

अजित पवारांच्या भाषणाचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. अजित पवारांची बोलण्याची शैली सर्वपरिचित आहेत. याची झलक वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्ताने बघायला मिळते. आज अजित पवारांच्या या मोकळ्या ढाकळ्या शैलीतील संवादाने उपस्थित लोटपोट हसले. हा किस्सा घडला अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना काटेवाडी गावात.

प्रत्येक आठवड्याच्या शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या बारामती मतदारसंघात असतात. नेहमीप्रमाणे आजही पवार यांचे बारामती मतदारसंघात विविध कार्यक्रम असून, काटेवाडी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान लोकांनी विविध समस्या सांगायला सुरुवात केली आणि अजित दादांनी तिथेच जनता दरबार सुरू केला. या कार्यक्रमात अजित पवार यांची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली.

कार्यक्रमात एका नागरिकाने जागेची मोजणी म्हणून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्याने समोरचा व्यक्ती ऐकत नाही, असं सांगितल्यावर अजित पवार आवाज चढवत बोलले. त्यांनी थेट उपस्थित असलेल्या पोलीस उप अधीक्षकांनाच आदेश सोडले.

'यांची एकत्र बैठक घेऊन वेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला,'असं म्हणताच उपस्थितांना हसू अनावर झालं.

त्यानंतर एका ग्रामस्थाने 'संत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे, पण त्याचा मोबदला मिळत नाही,' अशी तक्रार केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सूचना देत होते.

याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गाची नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत असा आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण झाले.

त्यावर अजित पवार यांनी मात्र कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केलं. त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतकऱ्याची तक्रार दूर करण्याची सूचना केली.

राज ठाकरेंना पुन्हा टोला

यावेळी संवाद साधताना अजित पवारांनी राज ठाकरेंना पुन्हा एकदा टोला लगावला. 'आपण कुणाच्या भावना न दुखावता सर्व जाती-धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे, यासाठी प्रयत्न करावेत. काहीजण समाजामध्ये वितुष्ट आणण्याचे प्रयत्न करतात. गैरसमज करण्याचा प्रयत्न करतात. कारण नसताना भोंगा कसा लावला पाहिजे. कुठला काढला पाहिजे, यातून सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.'

वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या पद्धतीनेच आपल्याला पुढे जावे लागेल. एकमेकांबद्दल आकस, गैरसमज, जातिभेद करून आपल्याला चालणार नाही. ही आपली परंपरा नाही हे आपण लक्षात घ्यावं. काही लोक जाणीवपूर्वक स्वतःची राजकीय पोळी भाजण्याकरता अशा प्रकारची वक्तव्य करतात,' असं अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in