
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सीटी चौक पोलीस ठाण्यात कलम १५३ अंतर्गत पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याव्यतिरीक्त औरंगाबाद पोलिसांनी IPC च्या 116, 117, 135 या कलमाअंतर्गतही राज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सभेचे आयोजक राजीव जेवळीकर व इतरांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढणार आहेत. १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मैदानावर सभा घेतली होती. आता याबाबतच एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
"राज ठाकरे यांच्या विरोधात कलम १५३, ११६, ११७ ही कलमं लावण्यात आली आहेत. कायद्याचे जाणकार सांगतात ही अतिशय सौम्य कलमं आहेत. यात राज ठाकरेंना सहज जामीन मिळू शकेल. यापेक्षा कलम १५३ अ लावलं असतं तर योग्य झालं असतं. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणं हाच राज ठाकरेंच्या सभेचा उद्देश होता. एखाद्या नेत्याने स्टेजवर उभं राहून कुठेतरी कोपऱ्यात गडबड झाली तर त्यांना तिथेच मारा हे सांगणं चुकीचं आहे. तिथे काही झालं असतं तर जबाबदारी कुणी घेतली असती? " असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी विचारला आहे.
आणखी काय म्हणाले जलील?
''मुख्यमंत्र्यांना असं वाटतं आहे का की माझा भाऊ आहे तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कसा दाखल करू? राष्ट्रवादीला वाटतंय की भविष्यात राज ठाकरेंसोबत जावं लागलं तर त्यांना आत्ता गंभीर गुन्ह्यांमध्ये कसं अडकवायचं? नवनीत राणांप्रमाणेच राज ठाकरेंवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला पाहिजे '' असंही जलील म्हणाले.
राज ठाकरेंच्या कोणत्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला?
"माझी पोलिसांना नम्र विनंती आहे. सभेच्या वेळेला बांग सुरू करणार असतील तर आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. यांना जर सहज सरळ मार्गाने समजत नसेल तर त्यानंतर महाराष्ट्रात काय होईल ते मला माहित नाही. इथे जे कुणी पोलीस अधिकाऱी असतील त्यांना मी सांगतो की आत्ताच्या आत्ता पहिलं जाऊन ते बंद करा... आणि माझं एक म्हणणं आहे याबाबतीत जर समजा सरळ भाषेत समजत नसेल ना एकदा काय ते तिच्या आयला होऊनच जाऊदे... अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही. संभाजीनगरच्या पोलिसांना माझी नम्र विनंती आहे मी आपल्याला जे सांगतोय ते जर या पद्धतीने वागणार असतील.. त्यांना जर सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगात काय ताकद आहे ती यांना दाखवावीच लागेल.. आणि म्हणून माझी पोलिसांना विनंती आहे की पहिल्यांदा हे थोबाडं बंद करा या लोकांची. माझी संपूर्ण देशवासीयांना अख्ख्या देशातल्या हिंदू बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे की बिलकुल मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत. सगळ्या धार्मिक स्थळांवरचे... मग ते मंदिरांवरचे असतील तरीही... पण यांचे उतरल्यानंतर. जर हे ३ तारखेपर्यंत ऐकलं नाही तर ४ तारखेला हनुमान चालीसा ऐकू आलीच पाहिजे. पोलिसांकडून वाटल्यास परवानगी घ्या. रितसर लाऊड स्पीकरची परवानगी घ्या, त्यांना द्यावी लागते. पण ती परवानगी घेऊन आपण सगळ्या गोष्टी जोरात कराल आणि सामाजिक दृष्ट्या प्रलंबित असलेला हा प्रश्न कायमचा निकाली लागेल यासाठी सगळ्यांनी हातभार लावावा"