
-योगेश पांडे, नागपूर
शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची नावं घेत गंभीर आरोप केला. संजय राऊतांच्या आरोपानंतर वरुड-मोर्शीचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. भूयार आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून, त्यापूर्वी त्यांनी 'मुंबई तक'शी संवाद साधला.
प्रश्न -संजय राऊत यांनी तुमचं नाव घेऊन गद्दारी केल्याचा आरोप केलाय, तुमची भूमिका काय?
देवेंद्र भुयार - मूळात मी त्यांच्या पक्षाबरोबर निवडून आलेलो नाहीये. मी अपक्ष निवडून आलोय. संघटनेकडून निवडून आलोय. मी लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जोडला गेलेलो आहे. विधानसभा निवडणूक झाली. सत्ता स्थापनेवेळी संजय राऊत यांचा पक्ष शिवसेना आघाडीत आला. त्यांच्यामुळे सरकार स्थापन झालं. ते राज्याचे प्रमुख आहेत, हे आम्हाला मान्य आहे. विधानसभेनंतरही मी एक मत मुख्यमंत्र्यांना दिलं. मला शिवसेनेकडून मंत्रीपदाची ऑफर होती, पण तरीही मी त्यांच्यासोबत गेलो नाही. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत राहिलो. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जी सूचना दिली. त्यानुसार पहिला क्रमांक संजय पवार आणि दुसरा पसंती क्रमांक संजय राऊत अशा पद्धतीने मी मतदान केलंय. संजय राऊतांनी जो आरोप लावला आहे, तो गैरसमजातून आहे. मी मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचा संदर्भ घेऊन त्यांनी ही टीका केलीये.
प्रश्न - तुम्ही मुख्यमंत्र्यांवर का नाराज आहात आणि ती त्यांना बोलून दाखवणार आहात का?
देवेंद्र भूयार - वरिष्ठ नेत्यांबद्दल टीका करताना कुणीही घाबरून टीका करत किंवा शक्यतो करत नाही. पण आमचं दुखणं आम्हाला सांगावं लागेल. मी अपक्ष आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. अशावेळी माझ्याकडे एक झुंजसारखं प्रकरण झालं. त्यात ११ लहान लेकरं मरण पावले. त्यावेळी पूर्ण हाहाकार माजला होता. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना २० ते २५ वेळा कॉल केले, पण त्यांचा माझा संपर्क काही लोकांनी होऊ दिला नाही. राज्याच्या प्रमुखांना याची माहिती होत नाही, याबद्दल माझ्या मनात खंत होती. संत्रा प्रक्रियासारखा मोठा प्रकल्प आहे. ज्यामधून हजारो शेतकऱ्यांचं हित साधलं जाईल. तो विषयही पुढे गेलेला नाही. फक्त घोषणा झालीये. तोही मी मुख्यमंत्र्यांकडे मांडला, पण त्यावर काही उत्तर आलं नाही. मी १६ ते १७ पत्रं मुख्यमंत्र्यांना दिलीये. पत्राचं उत्तर मात्र भेटलं नाही. मुख्यमंत्र्यांची भेटच होत नव्हती. निवडणुकीच्या निमित्ताने ८ जूनला भेट झाली. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडे हा विषय मांडला आणि त्यांना सांगितलं की, आपल्याबद्दल आमच्या मनात नाराजी आहे. आपण आम्हाला वेळच देत नाही, असं त्यांना सांगितलं. आपण आजारी होतात. ते सर्जरी झाली. पण नंतर आपल्याला वेळ मिळाला, तेव्हाही वेळ आम्हाला मिळाला नाही म्हणून आम्ही नाराज आहोत. पण मतदान शंभर टक्के आपल्यालाच करू हा सुद्धा शब्द मी तिथे दिलीप वळसे-पाटील असताना दिला.
प्रश्न - मग संजय राऊतांनी तुमचंच नाव का घेतलं, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्ही आता संजय राऊत, उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहात का?
देवेंद्र भूयार - मूळात त्यांनी तीन लोकांची नावं त्यांनी घेतली. श्यामसुंदर शिंदे, संजयमामा शिंदे आणि मी, अशा तीन लोकांची नावं त्यांनी जाहीरपणे घेतली आहे. यासंदर्भात मी आज शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. कारण महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांच्यासोबत आहे. प्रामाणिकपणाने आम्ही त्यांना मदत केलंय आणि तरीही मुख्यमंत्र्यांवर नाराज असल्याचं कारण सांगून परावभवामध्ये आमचं नाव घेणं चुकीचं आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करून मी स्वतः संजय राऊत यांना भेटणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही भेटणार आहे.
प्रश्न - संजय राऊत यांच्या विधानामुळे अपक्ष नाराज आहेत. त्यात विधान परिषदा निवडणुका येऊ घातल्या असून, तुमची भूमिका काय असणार आहे?
देवेंद्र भूयार - असे जर हे वागले, तर त्याचे परिणाम येऊ घातलेल्या विधान परिषद निवडणूक असेल, राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीत दिसेल. शंभर टक्के दिसेल, पण माझी भूमिका महाविकास आघाडीबद्दलचीच आहे. भाजपला माझा प्रखर विरोध आहे.