Bala Nandgaokar: "राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मनं जुळणं आता जवळपास अशक्य"

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत बाळा नांदगावकर यांनी या गोष्टी स्पष्ट केल्या
It is now almost impossible for Raj Thackeray and Uddhav Thackeray to come together Says Bala Nandgaokar
It is now almost impossible for Raj Thackeray and Uddhav Thackeray to come together Says Bala Nandgaokar

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मनं जुळणं आता जवळपास अशक्य आहे असं अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यानंतर मुंबई तकला दिलेल्या खास मुलाखतीत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येणं जवळपास अशक्य असल्याचं म्हटलं आहे.

It is now almost impossible for Raj Thackeray and Uddhav Thackeray to come together Says Bala Nandgaokar
राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी दिलं उत्तर..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मतमतांतरं झाली आहेत तसंच मनभेदही झाले आहेत. त्यामुळे आता हे दोघं जण एकत्र येणं अशक्य आहे. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला वाटत असलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं तरीही ते जवळपास अशक्य आहे असंही बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. इतकं सगळं झाल्यापासून २०१७ लाही मी स्वतः मातोश्रीवर गेलो होतो. मात्र तेव्हाही काही उपयोग झाला नाही. त्यावेळी मला राज ठाकरे यांनी सांगितलं अरे तुझा प्रस्ताव मान्य होणार नाही मी या सगळ्यांना लहानपणापासून ओळखतो. अगदी तसंच त्यावेळी घडलं.

It is now almost impossible for Raj Thackeray and Uddhav Thackeray to come together Says Bala Nandgaokar
राज ठाकरे म्हणाले, 'मनसैनिकांच्या काळजीपोटी अयोध्या दौरा रद्द केला; शिव्याही खायल्या तयार..'

काय म्हटलं आहे बाळा नांदगवकर यांनी?

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट एक ते सव्वा तास चालली. त्यामध्ये राजकीय चर्चा झाली असणारच. मात्र आम्हाला ती अद्याप समजू शकलेली नाही. मात्र राज ठाकरे जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही पुढचा निर्णय घेऊ असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. त्याचवेळी त्यांनी २०१४ मध्ये घडलेला एक प्रसंग सांगितला. त्यानंतर हे देखील स्पष्ट केलं की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मनं जुळणं जवळपास अशक्य आहे.

२०१४ मध्ये काय घडलं होतं?

उद्धव ठाकरे यांनी २०१४ मध्ये राज ठाकरे यांना फोन केला होता. तसंच आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हटलं होतं. या घटनेचा मी साक्षीदार आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी फोन केला तेव्हा राज ठाकरेंनी मला बोलावलं मला सांगितलं की दादूचा (उद्धव ठाकरे) फोन आला होता. भाजपसोबत युती तुटली होती. मला आजही ती तारीख आठवते. २३ सप्टेंबर २०१४ ला हा फोन आला होता.

मला त्यांनी सांगितलं तू उद्या शिवसेनेतल्या लोकांशी बोलून घे. २४ सप्टेंबरच्या सकाळी बाजीराव दांगट आणि देशमुख असे सगळे आले. त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजेत ही चर्चा झाली. मातोश्रीवरून ते आले होते. मला त्यांनी सांगितलं त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. त्यांना विचारलं या सगळ्याची बोलणी कोण करणार? उद्धव ठाकरेंनी सांगितलं आमच्याकडून अनिल देसाई बोलतील. मनसेकडून राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं की तू चर्चा कर. त्याप्रमाणे सगळं ठरलं.

२५ सप्टेंबर मधे दिवस होता. २६ सप्टेंबरला फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. २४ तारीख निघून गेली, त्यादिवशी माझं अनिल देसाईंसोबत बोलणं झालं ते म्हणाले जे काही आहे मी उद्धव ठाकरेंशी बोलून कळवतो. २५ तारीख उजाडली तेव्हाही फोन केला मी सांगतो एवढंच मला अनिल देसाईंनी सांगितलं होतं. सगळ्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवर मी सह्या केल्या. तो दिवसही जवळपास संपत आला. मला राज ठाकरेंनी परत बोलावलं मी सांगितलं की अजून काहीच निरोप नाही. मग मला राज ठाकरेंनी एबी फॉर्म द्यायला सांगितलं.

२५ तारखेच्या संध्याकाळी मी फोन केला. अनिल देसाईंच्या फोनवर त्या फोनवर आत्ताचे खासदार राजन विचारे भेटले. त्यांनी अनिल देसाईंना फोन दिला. मी त्यांना विचारलं की युती करायची नसेल तर स्पष्ट सांगा. आमची तसंच भाजपची युती होऊ नये म्हणून तुम्ही झुलवत असाल तर चुकीचं आहे. त्यानंतरही मला त्यांनी सांगतो, कळवतो इतकंच सांगितलं. आता हे सगळं राजकारण भाजपसोबत आम्ही जाऊ नये त्यावेळी म्हणून घडलं हे न कळण्या इतके आम्ही दुधखुळे नाही.

राज ठाकरेंच्या मनाला ही गोष्ट खूप लागली, भाजपसोबत मनसेने जाऊ नये म्हणून हे पद्धतशीरपणे गोड बोलून गळा कापण्याचा प्रयत्न झाला. हे राज ठाकरे यांना खूप लागलं. यावेळी उद्धव ठाकरे अडचणीत आले तेव्हाही उद्धव ठाकरे यांचा राज ठाकरेंना फोन गेला तरीही काहीही होणार नाही.

लीलावतीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंना रूग्णालयात दाखल केलं. त्यावेळी राज ठाकरे हे अलिबागला निघाले होते. त्यांना आधी डॉक्टरांचा मग बाळासाहेब ठाकरेंचा फोन आला. त्यानंतर राज ठाकरे अलिबाग दौरा सोडून लीलावतीला पोहचले. उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन होईपर्यंत थांबले, नंतर आपल्या कारने त्यांनी उद्धव ठाकरेंना घरी सोडलं. राजकारणाच्या पलिकडे आपण नाती जपत असतो. आज राज ठाकरेंचं पायाचं ऑपरेशन झालं त्यानंतर मातोश्रीवरून साधा फोन आलेला नाही. राज ठाकरे याबाबत काहीही बोलले नाहीत. मात्र माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला याचं वाईट वाटतंच. आम्ही संपूर्ण ठाकरे कुटुंबावर प्रेम केलं आहे. मात्र तसं घडलं नाही. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. कारण आता त्यांनी अपेक्षा ठेवून काहीही उपयोग नाही.

वरळीला निवडणूक झाली आम्ही तिथे उमेदवार दिला नाही. आपल्या कुटुंबातला मुलगा उभा आहे म्हणून आम्ही उमदेवार स्वतःहून दिला नाही. छगन भुजबळ, नारायण राणे हे शिवसेनेतून गेले त्यांनी माणसं फोडली. राज ठाकरे यांनी शाखा प्रमुखही फोडला नाही आपण आपल्या दमावर पक्ष उभं करू हे राज ठाकरेंनी ठरवलं. आत्ता आम्ही संघर्ष करतो आहोत. पण राज ठाकरे यशस्वी होतील हा माझा विश्वास आहे. राज ठाकरेंकडे पेशन्स आहेत. मात्र आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील ही शक्यता जवळपास मावळली आहे असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in