
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमध्ये ८ जून रोजी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर चांगलीच कडाडून टीका केली. भाजपने काढलेला आक्रोश मोर्चा, भाजपची भूमिका, राम मंदिर आणि बाबरी प्रश्न (Babri Masjid) या प्रश्नांवरून त्यांनी भाजपला लक्ष्य केलं. याच भाषणावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं आहे. ही सभा म्हणजे फक्त टोमणे आणि टोमणे होते असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करायची असते हे ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल आणि डिझेलचे दर जे सरकार कमी करत नाही त्यांनी दुसऱ्यांना अच्छे दिन सांगावे? हे म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण पुन्हा कोरडे पाषाण अशातला प्रकार आहे. माझे पुन्हा सवाल आहेत शेतकऱ्यांना मदत कधी करणार? पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी कधी करणार? ते सांगा.
संभाजीनगरचं नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, विकासाची काहीतरी ठोस योजना यापैकी संभाजीनगरला काहीतरी मिळेल असं वाटलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फक्त टोमणे आणि टोमणे होती. #टोमणेसभा असा हॅशटॅगही फडणवीस यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना काय टोला लगावला होता?
संभाजीनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. या सगळ्यात मध्ये कोणीतरी आक्रोश मोर्चा काढला होता. जनआक्रोश की जलआक्रोश. पण हा आक्रोश मोर्चा त्यांची सत्ता गेली म्हणून काढला होता. तो काही संभाजीनगरकरांच्या पाण्यासाठी नव्हता. कारण पाण्यासाठी जर का आक्रोश असता तर आमच्या आधी 5 वर्ष तुम्हीच बसला होतात तिकडे. आम्ही तुमच्या सोबत होतो. किती पैसे दिले होते या योजनेला?' असा टोला हाणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
'अनेक काही चांगल्या गोष्टी आम्ही करतोय. रस्त्याच्या कामाला हात घातलाय आणि रस्ते देखील चांगले होत चालले आहेत. जर मेट्रोची गरज लागली तर मेट्रोचा प्लॅन बनविण्याची सुरुवात आपण केलेली आहे. पण आपल्याकडे जी मेट्रो बनेल ती मेट्रो शहराचं विद्रुपीकरण करणारी नसेल. आम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, वाट्टेल ते करा. शहराची विल्हेवाट लागली तरी चालेल पण मेट्रो झालीच पाहिजे हे असं विध्वंसक विकास काम आम्ही कधी केलेलं नाही.
अच्छे दिनची घोषणा भाजपने २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी केली होती. तसंच राम मंदिर बांधण्याचीही घोषणा केली होती. कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा ही घोषणाही भाजपने केली होती. या सगळ्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला. मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंरी सभा ही फक्त टोमणे सभा होती असा टोला लगावला आहे.