Latur : ग्रामपंचायतीच्या मतदानावर १०० टक्के बहिष्कार; गावकऱ्यांनी का घेतली संतप्त भूमिका?

लातूरमधील एका गावातील नागरिकांनी संतप्त भूमिका घेण्यासारखं काय घडलं?
Voting Ban
Voting BanMumbai Tak

लातूर (अनिकेत जाधव) :

राज्यात आज (रविवारी) ७ हजार ५०० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी (बुद्रुक) गावात मात्र निवडणूक असूनही शांतता आहे. गावातील मतदानाची वेळ संपली पण आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाही. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे.

नेमकं काय आहे कारण?

बोंबळी (बुद्रुक) या गावची ग्रुप ग्रामपंचायत असून ती बोंबळी (खुर्द) या गावाला जोडलेली आहे. मात्र बोंबळी (बुद्रुक) गावाने मागील काही वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली आहे. याच मागणीसाठी आजच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.

स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी एका महिन्यापूर्वी देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे आणि लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देण्यात आले होते, यात गावकऱ्यांकडून बोंबळी (बुद्रुक) स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी करण्यात आली होती. तसंच मागणी पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांकडून दिला गेला होता.

गावकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार सुरेश घोळवे यांनी बोंबळी (बुद्रुक) मधील गावकऱ्यांशी संवाद साधला होता. मात्र या बैठकीत गावकऱ्यांचं समाधान होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे आज होत असलेल्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका कायम ठेवली. आज सकाळपासून गावात एकही मतदान झालेलं नाही.

का होतीय स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी?

बोंबळी (बुद्रुक) आणि बोंबळी (खुर्द) या गावांमध्ये फक्त अर्ध्या किलोमीटरचं अंतर आहे. ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये एकूण ९ सदस्य आहेत. ज्यापैकी लोकसंख्येनुसार ६ सदस्य बोंबळी (खुर्द) चे आणि ३ सदस्य बोंबळी (बुद्रुक) गावचे आहेत. सदस्य संख्या जास्त असल्यामुळे मागील २५ वर्षांपासून सरपंचपद बोंबळी (खुर्द) गावाकडे आहे.

त्यामुळे बोंबळी (बुद्रुक) या गावसोबत शासकीय योजनांसाठी नेहमीच भेदभाव केला जातो, असा आरोप गावकऱ्यांनी केला. २५ वर्षापासून गावकऱ्यांना पिण्याचं पाणी, शाळा, वैद्यकीय सेवा अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळेच बोंबळी बुद्रुक गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in