
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत तसे संकेत दिले आहेत.
गेल्या २४ तासांपासून निष्ठावंत शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याभोवती महाराष्ट्राच्या राजकारणाने फेर धरला आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करून बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात होतं. मात्र, रात्रीतून परिस्थिती बदलल्याचं दिसत आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० पेक्षा जास्त आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केल्यानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं.
संजय राऊत यांच्या ट्विटने राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार जाण्याची शक्यता बळावली आहे. तसे संकेत राऊतांनी दिले आहेत. "महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभा बरखास्तीचया दिशेने," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार-उद्धव ठाकरे भेट
शिवसेनेला मोठं खिंडार पडल्यानं सरकारचं काय होईल, याची कालपासून चर्चा सुरू होती. मात्र आता राऊतांनी ट्विट केल्यानं सरकार जाणार अशीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या सगळ्या राजकीय घडामोडींच्या धावपळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या बैठकीत काय होणार हेही महत्त्वाचं असणार आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष
आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय चर्चा होणार? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील नेते या सगळ्यावर काय भूमिका घेतात हेही पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी एक बैठक होणार असल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे याबैठकीत कोणत्या वेगळ्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे बघावं लागणार.