देवेंद्र फडणवीस : वकील ते कुशल राजकारणी, नगरसेवक ते उपमुख्यमंत्री व्हाया मुख्यमंत्री

राज्याच्या राजकारणातील सर्वांत महत्वाचं नावं म्हणजे देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis Mumbai Tak

राज्याच्या राजकारणात सध्या सर्वांत महत्वाचं नावं कोणाचं असेल तर ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. याचं कारण म्हणजे आता सध्या राज्यात अस्तित्वात असलेलं शिंदे-फडणवीस सरकारचे खरे कलाकार तेच आहेत. याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना कबुली दिली आहे. नागपूर महानगरपालिकेमधील एक नगरसेवक ते महाराष्ट्रासारख्या अत्यंत महत्वाच्या राज्याचं मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्ष नेता आणि राज्यातील स्थिर सरकार पाडून पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून महत्वाची जबाबदारी उचलण्यापर्यंत फडणवीस यांनी मारलेली मजलं खूपचं मोठी असल्याचं अनेक ज्येष्ठ पत्रकार आणि भाजपचे नेते सांगतात. मात्र फडणवीस यांचा हा प्रवास एका रात्रीत झालेला नाही. त्यासाठी त्यांच्या मागील ३० वर्षांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेणं गरजेचं आहे.

घरातच राजकीय पार्श्वभूमी :

देवेंद्र फडणवीस यांच्या ३० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घ्यायचा झाल्यास त्यांच्या घरापासून सुरुवात करावी लागेल. फडणवीस यांचे वडील स्व. गंगधारराव फडणवीस हे जनसंघ आणि भाजपाचे आघाडीचे नेते होते. भाजपकडून अनेक वर्षं ते विधान परिषदेचे आमदार होते. मात्र १९८८-८९ मध्ये गंगाधराव फडणवीस यांचं निधनं झालं. वडिलांचं निधनं झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त १७ वर्षांचे होते. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या काकी शोभाताई फडणवीस याही १९९० ते २००९ अशा जवळपास ४ टर्म चंद्रपूरमधील साओली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.

राजकीय कुटुंबातच फडणवीस यांचा जन्म :

या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात २२ जुलै १९७० साली नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला. घरात आधीच राजकीय वातावरण त्यातं नागपूरमध्ये फडणवीस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये जाऊ लागले. जनसंघ, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा राजकीय संस्कार ते मोठे झाले. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा पगडा होता. याबाबत त्यांनी एका मुलाखतीमध्ये आठवण सांगितली आहे. फडणवीस यांच्या शाळेच्या नावात इंदिरा होतं म्हणून त्यांनी ती शाळा बदलली. पुढे सरस्वती विद्यालयात त्यांचं शिक्षण झालं.

महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाकडे पावलं :

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फडणवीस यांना वकील होण्याची इच्छा होती. त्यामुळे बारावीनंतरच त्यांनी थेट पाच वर्षांच्या कायद्याच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. धरमपेठ विद्यालयातून कॉमर्सची आणि कायद्याची पदवी घेतली. कायद्याच्या पदवीत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं. कॉलेजमध्ये असतानाच फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत होते. यातूनच ते कॉलेजमधील, विद्यापीठांमधील निवडणुकांमध्ये सहभाग घेत होते. पॅनेल उभं करणं, ते निवडून आणणं यासाठी त्यांनी काम केलं.

पहिल्यांदा नागपूर महापालिकेमध्ये नगरसेवक :

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फडणवीस यांनी भाजपचे काम सुरु केले. अशातच १९९२ मध्ये नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. मात्र त्याचवेळी प्रभागातील नगरसेवकांच्या जागी फडणवीस यांना संधी मिळाली. तिथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. १९९२ साली ते महापालिकेत अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक झाले. इतक्या कमी वयात नगरसेवक होणारे तेव्हा ते पहिलेच होते.

१९९७ साली थेट महापौर :

१९९७ साली ते पुन्हा महापालिकेवर निवडून गेले. यंदा मात्र ते थेट महापौर झाले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी नागपूरसारख्या महत्वाच्या महापालिकेचे महापौर म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली.

कमी वयातचं आमदार देवेंद्र फडणवीस :

सर्वांत कमी वयाचे महापौर म्हणून काम केल्यानंतर अवघ्या २ वर्षांत त्यांना आमदार होता आलं. १९९९ साली फडणवीस यांनी पहिल्यांदा विधानसभेत आमदार म्हणून प्रवेश केला. पश्चिम नागपूर मतदारसंघातून ते निवडून गेले. त्यावर्षी भाजप-शिवसेना युती सरकार जाऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडीचे सरकार सत्तेत आलं. त्यामुळे त्यांच्यावर विरोधी बाकांवर बसण्याची वेळं आली. मात्र विरोधात असताना भाजपचे नेते नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, सिंचन घोटाळा अशा विषयांवर राज्याचं राजकारण ढवळून काढलं. पुढे २००४, २००९ मध्येही राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत राहिलं. मात्र या काळात त्यांनी विरोधक म्हणून सरकारला अनेकदा अडचणीत आणलं होतं.

आमदार असताना फडणवीस मॉडेल झाले :

देवेंद्र फडणवीस यांचे रंगेबिरंगी शर्टमधील जुने फोटो अधून-मधून सोशल मीडियावर व्हायरल असतात. पण हे फोटो साधेसुधे नसून त्यांनी ते आमदार असताना एका शर्टाच्या जाहिरातीसाठी मॉडेल म्हणून काढलेले फोटो आहेत. नागपुरचे प्रसिद्ध छायाचित्रकार विवेक रानडे यांनी एका शर्टा कंपनीसाठी हे फोटो काढले होते. त्याकाळी या फोटोंची खूप चर्चा झाली. इतकी की ही चर्चा थेट अटलबिहारी वाजपेयींपर्यंत पोहचली होती. त्यांनी फडणवीस यांना बोलावून घेतलं. त्यावेळी त्यांनी "आओ मॉडेल" असं म्हणतं फडणवीस यांचं स्वागतं केलं होतं.

२०१३ मध्ये फडणवीसांवर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी :

जवळपास १५ वर्ष विरोधात काम केल्यानंतर फडणवीस यांना पक्षात अत्यंत महत्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. २०१३ साली त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागं वळून बघितलं नाही. पुढच्या एका वर्षांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपनं चांगली कामगिरी केली. २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीही तुटली. त्यावेळी फडणवीस यांच्यासमोर भाजपला यश मिळवून देण्याचे मोठं आव्हान होतं. मात्र त्यांनी ते आव्हान लिलया पेललं. भाजप १२२ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला.

२०१४ मध्ये फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची संधी :

२०१४ फडणवीस यांना त्यांच्या कष्टाचं फळ मुख्यमंत्रीपदाच्या रुपातं मिळालं. राज्यात सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, नितीन गडकरी अशा अनेक बड्या नेत्यांना मागं टाकतं त्यांनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली. खरंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. मात्र त्याचवर्षीच्या जून महिन्यात त्यांचं अपघाती निधन झालं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. अर्थात मुख्यमंत्रिपद मिळण्यासाठी आणखीही काही मुद्दे महत्त्वाचे होते. मात्र यानंतर फडणवीस यांच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू झालं.

फडणवीस यांची एक मोठी राजकीय चुक, पहाटेचा शपथविधी :

५ वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना युतीला पुन्हा यश मिळालं. मात्र निकाल लागताच अवघ्या काही दिवसात युती तुटली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार होतं. मात्र त्यापूर्वीच २३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबरोबर त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय आयुष्यातली ही सगळ्यांत मोठी घटना होती. मात्र पुढे अवध्या ८० तासांत या सरकारला राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाले .मात्र पहाटेचा शपथविधी ही एक चूक होती असं त्यांनी नंतर अनेक मुलाखतींमध्ये कबूल केलं आहे.

यशस्वी विरोधी पक्ष नेता :

कोरोना काळ, अतिवृष्टी, चक्री वादळं अशा अनेक प्रसंगांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणजे काय असतो हे राज्याला दाखवून दिलं होतं. अडीच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः गाजवली. फडणवीस यांनी अनेकदा सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. याच काळात फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात भाजपनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानपरिषद, राज्यसभा अशा निवडणुकांमध्ये यश खेचून आणलं.

एकनाथ शिंदे यांचं बंड आणि देवेंद्र फडणवीस :

अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते म्हणून काम केल्यानंतर फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात मोठी खेळी खेळली. शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंड केलं. ४० आमदारांसह ते आधी सुरत आणि नंतर गुवाहटीला रवाना झाले. शिंदे यांच्या बंडाच्या काळात देवेंद्र फडणवीस अतिशय शांत होते. त्यांनी या काळात कोणतंही वक्तव्य केलं नाही. मात्र आठवड्याभरानंतर फडणवीस यांनी राजभवनावर जाऊन सरकार अल्पमतात असल्याचं पत्र दिलं आणि बहुमत सिद्ध करण्याची मागणी केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मात्र सरकारचे खरे कलाकार तेच आहेत. याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना कबुली दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस :

३० जून २०२२ ला संध्याकाळी राजभवनात एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीची तयारी चालू होती. आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार या घोषणेने महाराष्ट्राला एक धक्का बसला होता. त्यातून सावरत नाही तेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात सामील व्हावं असा आदेश दिला. त्यांनी माध्यमांसमोरही याबाबत प्रतिक्रिया दिली.

या आदेशानं शपथविधी सोहळ्याचं पूर्ण रूप पालटलं. आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्यावरील सगळा रोख पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यावर गेला. मुख्यमंत्री व्हायला निघालेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं, अशी खोचक टिपण्णी त्यावेळी विरोधकांनी केली. मात्र अत्यंत खोल आवाजात त्यांनी कशीतरी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय आयुष्यात आणखी एका नाट्यमय घटनेची नोंद झाली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in