
नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला, धर्मवीर घरा घरात पोहचवले. आता ओके वाटतं आहे. काही लोकांना धर्मवरी आवडला नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. धर्मवीर हा सिनेमा मे महिन्यात रिलिज झाला. या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे तर दिग्दर्शन प्रवीण तरडेने केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाच्या एक ते सव्वा महिना आधी हा सिनेमा रिलिज झाला होता.
यावरून आत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही लोकांना धर्मवीर सिनेमा आवडला नाही म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. कारण धर्मवीर सिनेमा पाहण्यासाठी जेव्हा उद्धव ठाकरे गेले होते तेव्हा ते शेवट होण्याआधी सिनेमा थिएटरमधून बाहेर पडले होते. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा पार पडला. रात्री १२.३० च्या नंतर हा कार्यक्रम सुरू झाला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता आपल्याला ओके वाटतं आहे असंही म्हटलं आहे.
नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला याचं आम्हाला समाधान आहे. सहा महिन्यात एक चित्र दिसत गेलं, जे आम्हाला सगळीकडे घातक दिसत होतं. आम्हाला लक्षात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडेच आमदारकीसाठी तयारी करत होती. शिवसेना सत्तेत असूनही काही होत नव्हतं. आमच्या आमदारांना निधी मिळत नव्हता, यात आमदारांचा स्वार्थ नव्हता. पण जनतेची कामं लक्षात घ्यावी लागतात. आज कार्यकर्त्यांना काय मिळालं? कामं मिळाली? गुन्हे दाखल झाले, पण न्याय मिळाला नाही.
बाळासाहेब ठाकरे नेहेमी सांगायचे शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये. नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही धर्मवीर घराघरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर सिनेमा आवडला नाही. ज्यांना नाही आवडला तर नाही आवडला आम्ही पुढे जाणार. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आमचा शत्रू आहे. औरंगाबादचे नाव संभाजी नगर कधी झाले, जेव्हा आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा मांडला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम केले तर आम्ही दोषी ठरलो? असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एवढंच नाही तर रात्री उशिरा झालेल्या मेळाव्याचंही त्यांनी कौतुक केलं. राज्यात रात्री दोन वाजता एक तरी सभा आजवर झाली आहे का? जे कार्यकर्ते संभाजी नगरहून आले आहेत त्यांना वाट बघावी लागली पण ते थांबले आहेत. रात्री उशिरापर्यंतच्या कार्यक्रमातही ते थकले नाहीत हे लोकांचं प्रेम आहे जे आम्हाला मिळतं आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.