'मोदींचे हात आणि तोंड नेहरूंनी बांधून ठेवलंय का?' मुनगंटीवारांना तोंडाळ मंत्री म्हणत ठाकरे संतापले

"मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल! त्यातच सगळ्यांचे हित आहे", उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून काय म्हटलंय?
maharashtra karnataka border dispute : uddhav thackeray narendra modi sudhir mungantiwar
maharashtra karnataka border dispute : uddhav thackeray narendra modi sudhir mungantiwar

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून वर आलाय. हा प्रश्न ऐरणीवर येण्याचं कारण ठरलं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचं विधान. जत, अक्कलकोटवर कर्नाटक दावा ठोकणार, असं बोम्मई म्हणालेत. त्यावरून उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात मोदींच्या मध्यस्थीचा दाखला देत ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार आणि एकनाथ शिंदेंना खडेबोल सुनावलेत.

बसवराज बोम्मईंच्या विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय. उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनाच्या अग्रलेखात यावर भाष्य करण्यात आलं असून, भाजपसह एकनाथ शिंदेंनाही लक्ष्य करण्यात आलंय.

सामना अग्रलेखात म्हटलंय, "राज्यात कमजोर, अशक्त, बेकायदेशीर 'खोके' सरकार आल्यापासून इतर राज्यांनी महाराष्ट्रावर हल्ले सुरू केले. बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प असून सरकार वाचविण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत", असा टोला शिंदेंना लगावला आहे.

maharashtra karnataka border dispute : uddhav thackeray narendra modi sudhir mungantiwar
बेळगाव, निपाणी, कारवार हा आमचाच भाग : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फडणवीसांचं उत्तर

"कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई महाशयांनी महाराष्ट्रातील जत, अक्कलकोट वगैरे गावे कर्नाटकात खेचण्याची भाषा केली आहे. महाराष्ट्र अस्मितेचा हा असा घोर अपमान होऊनही 'खोके' गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही", अशी टीका सामना अग्रलेखातून शिंदे गटावर करण्यात आलीये.

सुधीर मुनगंटीवार तोंडाळ मंत्री, सामना अग्रलेखात काय म्हटलंय?

"भाजपचे आमदार व मंत्री यावर मऱ्हाठी बाण्याची खणखणीत भूमिका घेतील ही अपेक्षाच करू नये. अर्थात भाजपचे एक तोंडाळ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नेहमीप्रमाणे या प्रश्नाचे खापरही पंडित नेहरूंवर फोडले आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले की, 'महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद ही खरे तर दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची देणगी आहे.' आता प्रश्न असा की, नेहरूंनी केलेली चूक तुमचे जोरदार पंतप्रधान मोदी का सुधारत नाहीत?", असा सवाल ठाकरेंनी सामना अग्रलेखातून केलाय.

"मोदी हे रशिया आणि युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात, तोडगा काढतात; पण बेळगावातील सीमा बांधवांवर होणाऱ्या अत्याचारांवर बोलत नाहीत. मराठी बांधवांवरील अन्याय रोखू नये यासाठी मोदी सरकारचे हात व तोंड नेहरूंनी बांधून ठेवले आहे काय?", अशी शेलकी टीका ठाकरेंनी मोदी आणि भाजपवर केलीये.

"मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत"

"मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणे कधीकाळी सीमा भागात जाऊन आंदोलन केले असे सांगतात, पण गेल्या अनेक वर्षांपासून या महाशयांकडे सीमा भागाचा कार्यभार होता. ते किती वेळा बेळगावला गेले? गेल्या चारेक महिन्यांपासून ते मुख्यमंत्री आहेत. काय केले त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी? मुख्यमंत्र्यांचे रोज चार तास तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीत जात आहेत, पण सीमा बांधवांचे भविष्य आणि भवितव्य तसेच अंधकारमय आहे. तंत्र-मंत्र व ज्योतिषगिरीतून वेळ मिळाला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा कठोर समाचार घेतला पाहिजे", असा चिमटा एकनाथ शिंदेंना ठाकरेंनी काढला.

maharashtra karnataka border dispute : uddhav thackeray narendra modi sudhir mungantiwar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिरगावला भविष्य पाहण्यासाठी गेले होते? अंनिसने नेमका काय घेतला आक्षेप?

"ठाणे-कल्याणमधील शिवसेनेच्या शाखा, शिवसैनिकांची घरे बळाचा वापर करून ताब्यात घेणे ही मर्दानगी नसून कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांच्या मस्तवाल भाषेस सडेतोड उत्तर देणे व बेळगावात घुसून मराठीजनांच्या पाठीशी उभे राहणे हेच शिवरायांच्या महाराष्ट्राचे शौर्य आहे, पण आज महाराष्ट्रात या शौर्याचा व मर्दानगीचा दुष्काळ पडल्यानेच बेळगावमधील मराठी सीमा बांधवांच्या छाताडावर पाय ठेवून कानडी मुख्यमंत्र्यांनी आज सांगलीतील जत व सोलापुरातील अक्कलकोटवर दावा सांगितला आहे."

सामना अग्रलेख : "मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल"

"महाराष्ट्रात सध्या सत्तेत असलेल्या खोके सरकारात जीव नाही. मनगटात सळसळ नाही. लढण्याची धमक नाही. महाराष्ट्र कालपर्यंत पाणी दाखवत होता, आज महाराष्ट्राचे पाणी जोखले जात आहे. मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल! त्यातच सगळ्यांचे हित आहे", असा इशारा ठाकरेंनी शिंदे सरकारला दिलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in