
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेच कसा सुटणार याकडे लक्ष लागलेलं असताना आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे. महिला काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर यांनी महाराष्ट्रातील राजकीय बंडाचा संदर्भात देत याचिका दाखल केली आहे. जया ठाकूर यांनी ठाकूर यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर पुन्हा एकदा बोट ठेवलं आहे.
जया ठाकूर या मध्य प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करत थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्यानं त्यांनी या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जया ठाकूर यांनी याचिकेत काय म्हटलंय?
सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या जया ठाकूर यांनी शिवसेनेविरुद्ध बंड करणाऱ्या आमदारांचा संदर्भ देत दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीये. 'पक्षांतर करणाऱ्या आमदारांना पाच वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, असे आदेश द्या. शिवसेना आमदारांचा पक्षांतराचा प्रयत्न अयोग्य आहे, कारण ते दोन तृतीयांशपेक्षा कमी आहे,' असं याचिकेत म्हटलंय.
जया ठाकूर यांनी यापूर्वी पक्षांतरासंदर्भात २०२१ मध्येच एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल येणं प्रलंबित आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले असूनही केंद्र सरकारने पक्षांतर प्रकरणात अद्याप कोणतीही पावले उचलली नाहीत, असं ठाकूर यांनी या याचिकेत नमूद केलंय.
"याचाच फायदा घेऊन देशातील राजकीय पक्ष आणि बंडखोर स्वार्थी आमदार देशातील विविध राज्यातील निवडून आलेली सरकारं सातत्यानं पाडतं आहेत. लोकशाहीमध्ये राजकीय पक्षाचं महत्त्व आणि सुशासन राहण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य स्थिरता आवश्यक असते", असंही त्यांनी म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ३० पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार डळमळलं आहे. अचानक पडलेल्या या भगदाडाने शिवसेनेसमोर सरकार आणि पक्ष वाचवण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकजूट दाखवली आहे. मात्र, पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अद्याप तरी त्यांच्यावर या कायद्यानुसार कारवाई होऊ शकत नाही.
पक्षांतर बंदी कायद्याचा फटक्यातून वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे ३७ आमदार फोडावे लागणार आहे. सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडून ४० पेक्षा जास्त आमदार सोबत असल्याचा दावा केला जातोय. मात्र, विधानसभा अध्यक्षांकडे ते अजून सिद्ध झालेलं नाही.
३७ किंवा त्यापेक्षा जास्त आमदार मिळवण्यात एकनाथ शिंदे यांना यश आलं, तर त्यानंतर ते विधानसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गट म्हणून मान्यता देण्याची किंवा आपला गट हाच शिवसेना पक्ष असल्याचा दावा करू शकतात. ते हे सर्व करणार का हे अजून अधांतरीच आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची तयारी
बंडखोरी करणाऱ्या आमदारांची संख्या जास्त असल्यानं शिवसेनेनं नव्याने आव्हान केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या निवेदनानंतर आज संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आव्हान केलंय. परत आल्यानंतर चर्चा करूयात. शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेरही पडेल, असं राऊत यांनी म्हटलंय.