...तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शिवसेनेत येतील -प्रकाश आंबेडकर
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांनी शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार फोडल्याचा दावा केलाय. त्यामुळे आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत चालली आहे. राज्यात निर्माण झालेल्या राजकीय नाट्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि कायदेतज्ज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचं भाष्य केलं आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत केलेल्या संवादात प्रकाश आंबेडकर म्हणाले, "काल उद्धव ठाकरेंनी जे विधान केलं, ते महत्त्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय की, एखाद्या आमदाराने येऊन सांगितलं, तर राजीनामा देऊन टाकेन. जे एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत, त्यांच्यापैकी. आता त्यांच्यापैकी कुणी परत येऊ शकणार नाही. ही पहिली गोष्ट," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"दुसरी गोष्ट म्हणजे गुवाहाटीत असलेले एकनाथ शिंदे असा दावा करत आहेत की, त्यांच्याकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदार आहेत. त्यांच्या दाव्याला कुणीही आव्हान दिलेलं नाही. आता किती दिवस एकनाथ शिंदे पुढे ढकलणार, हे महत्त्वाचं आहे. माझ्यामते राज्यपाल जोपर्यंत आयसोलेशनमध्ये आहेत, तोपर्यंत हे चालू शकतं. पण ते एकनाथ शिंदेंच्या फायद्याचं आहे का, तर अजिबात नाही," अशी भिती आंबेडकर यांनी व्यक्त केली.
"शिवसेनेतील मुख्य गटातून एक गट वेगळा होऊ बघतोय, अशी स्थिती आहे आणि काहीही मिळणार नसेल, तर मग ते परत शिवसेनेमध्ये जातील. त्यांना काहीही अडचण नाहीये. त्यामुळे माझ्या अंदाजाप्रमाणे एकनाथ शिंदे यांना राज्यपालांना किंवा विधानसभा अध्यक्षांना आज पत्र द्यावं लागेल," असं प्रकाश आंबेडकर यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितलं.
"यात एक कायदेशीर मुद्दा उपस्थित झालेला की, विधानसभा अध्यक्ष नाही. पण उपाध्यक्ष आहे आणि अध्यक्ष नसेल, तर उपाध्यक्ष अध्यक्षांचे अधिकार वापरू शकतात, असा निवाडा न्यायालयाने अनेकवेळा दिलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा उपस्थित होत नाही."
"एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पत्र दिलं, तर एकच होईल की, राज्यपाल उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगतील. समजा एकनाथ शिंदे यांनी हे पत्र, जर राज्यपालांना न देता आमच्या गटाला मान्यता द्यावी म्हणून विधानसभा उपाध्यक्षांना दिलं, तर कायद्याने उपाध्यक्षांना ज्यांनी सह्या केल्या आहेत, त्या सगळ्यांना बोलवावं लागेल आणि ही सही तुमची आहे का हे व्यक्तिशः बघून घ्यावं लागेल," अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
"ज्यांची सही नाही, त्यांना विचारलं जाईल की, तुम्ही इथे (शिंदे गटासोबत) आहात की, तिथे (शिवसेनेसोबत). त्यावरून मग पक्षांतर बंदी कायदा लागतो की नाही, हा त्यातील एक भाग आहे."
"आणखी एक कायदेशीर मुद्दा म्हणजे जो अजून निश्चित झालेला नाही. तो म्हणजे निवडणूक आयोगाकडे संसदीय पक्षाची नोंदणी नाही. ज्याची नोंद आहे ती राजकीय पार्टी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी जो काही नवीन गट ते स्थापन करणार आहे, त्याचं नाव नोंदणीसाठी टाकलंय का हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे," असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
"तो जर टाकला नसेल, तर विधानसभा अध्यक्षांना खूप मोठे अधिकार आहेत. तिथे अर्ज आला की, त्याचं काय करायचं याचा. यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे भाजप. भाजपने अजूनही त्याचे पत्ते उघड केलेले नाहीत. ते म्हणताहेत की ते ताक सुद्धा फुंकून पित आहेत. पण मला तसं काही वाटतं नाही."
"भाजपकडून एक प्रचार दोन वर्षांपासून जोरात सुरूये आणि त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा आहे. ते म्हणजे हिंदू मतदारांचे आम्हीच प्रतिनिधी आहोत. याचा अर्थ दुसऱ्या कुणाचंही अस्तित्व राहावं अशी त्यांची इच्छा नाही. त्यामुळे संधी आलीये. हा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या चाचणीचा मुद्दा आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
"एकनाथ शिंदे हे आपला गट एकत्र ठेवू शकतात का आणि भाजप एकनाथ शिंदेंना तुम्ही आमच्या पक्षात येता का अशी परिस्थिती येऊ शकते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं खरंच भांडण झालेलं असेल, तर ते परत शिवसेनेत जाऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे कौशल्याने स्वतःला वेगळं ठेवतात, यावर पुढच्या घडामोडी अवलंबून असतील," असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.