
एकनाथ शिंदेंसह पक्षातील आमदारांनी केलेल्या बंडाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचं बंड शमवण्याचे प्रयत्न सुरू असून, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात तासभर चर्चा झाली. याची माहिती स्वतः राऊतांनीच दिली.
मुंबई माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "राज्यपालांना कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांचं काम मंदावलं आहे. राज्यपालांना आधी बरं वाटू द्या. मग बघू कुणाकडे किती आमदार आहेत. आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे एकनाथ शिंदेंसह आमचे सर्व लोक स्वगृही परत येतील. हा आमच्या घरातील विषय आहे. ते सर्व लोक आमच्या घरात येतील. एकनाथ शिंदे किंवा इतर लोक, सगळे परत येतील. त्यांचा आणि आमचा व्यवस्थित संवाद सुरू आहेत."
"राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर नाराज असल्याची आमदारांची भूमिका. मला याबद्दल माहिती नाही. आम्ही त्यांच्यासोबत सरकारमध्ये आहोत. एकत्र आहोत. असं कुठल्या आमदाराने म्हटलंय असं मला वाटतं नाही," असं राऊत म्हणाले.
"आज सकाळीच माझं एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालंय. त्यांच्याशी पक्षाचा संवाद सुरू आहे. एकनाथ शिंदे शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरेंपासून ते आतापर्यंत त्यांनी शिवसेनेचंच काम केलं आहे. त्यांच्याविषयी आणि एकमेकांविषयी आमच्या मनात कायम सद्भावना आहेत. चर्चा, संवाद सुरू असतात."
"एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझं सकाळीच बोलणं झालंय आणि मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही कल्पना दिली आहे. शिवसेनेत काही होतंय म्हणून कुणाला आनंदाचं भरतं आलं असेल, तर तसं नाहीये. जे बाहेर आहेत. ते सगळे शिवसैनिक आहेत आणि त्या सगळ्यांना शिवसेनेसोबतच राहायचं आहे," असं राऊत म्हणाले.
"काही गैरसमज असतात. त्यातून या गोष्टी घडल्या असतील तर त्या दूर होतील. यामुळे ठाकरे सरकार पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असं भाजपला वाटतं असेल, तर शिवसेनेमध्ये राखेतून जन्म घेण्याची ताकद आहे. शिवसेनेनं अनेकदा राखेतून गरुडझेप घेतलीये. हा गेल्या ५६ वर्षातील इतिहास आहे. पण एकनाथ शिंदे आमचे जिवाभावाचे सहकारी आहेत. अनेक वर्षांपासून आम्ही काम करतोय. त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असून ती सकारात्मक आहे," असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
"एकनाथ शिंदे जुने सहकारी आहेत. मित्र आहेत. त्यामुळे पक्ष सोडणं त्यांच्यासाठी सोपं नाही आणि त्यांना सोडणं आमच्यासाठीही सोपं नाहीये. आमची सकाळी तासभर चर्चा झाली. कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. पुन्हा चर्चा होईल. सर्व आमदारांसोबतही आमची चर्चा सुरू होईल," अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
"एकनाथ शिंदे यांची कोणतीही मागणी नाही. त्यांचा मी, उद्धव ठाकरे यांच्यासह कुणावरही राग नाहीये. त्यांनी कोणत्याही अटी-शर्थी ठेवलेल्या नाहीत. ते शिवसेनेतच राहतील आणि शिवसैनिक म्हणूनच काम करतील. जे काही सांगितलं जात आहे, त्यात तथ्य नाही."
"शिवसेना पाठीमागून कारवाया किंवा वार करत नाही. जे करायचं ते समोरून करते. माझी काल आणी आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. दिवसभरात शरद पवार आणि उद्धव ठाकरे भेटतील. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहे. आम्ही संघर्ष करू. जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल. महाराष्ट्रातील सत्ता जाईल. पण पक्षाची प्रतिष्ठा असते आणि ती महत्त्वाची आहे," असं विधान राऊत यांनी केलं.